जवळपास दोन हजार लोक बसू शकतील इतक्या मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर २० कोटी रुपयांचे शासकीय सभागृह उभारणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
शासनाच्या वतीने माजी मुख्यमंत्री दिवं. वसंतराव नाईक यांचे १ जुलै २०१२ ते ३० जून २०१३ हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबविले जाणार असून त्यासाठी शासनाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या उपक्रमात दिवं. वसंतराव नाईक यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मगावी उभारणार असून कृषी दिंडी, चित्रमय म्युझियम, समाजभूषण पुरस्कार अशा विविध कामांचा समावेश आहे.
शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी समिती गठित केली आहे. जन्मशताब्दी वर्षांनिमित्त घ्यावयाच्या उपक्रमाविषयी नुकतीच समितीची बैठक झाली असून त्यावर चर्चा झाली. यावेळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या धर्तीवर साधारणत: १५०० ते २००० नागरिक बसू शकतील असे शासकीय सभागृह बांधण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. या प्रस्तावाला २० कोटींचा निधी समितीने मंजुरी देऊन राखून ठेवला, असेही त्यांनी सांगितले.
अनिल देशमुख यांनी समितीसमोर जन्मशताब्दी वर्षांनिमित्त पुढील कामांचा आग्रही केला आहे. दिवं. वसंतराव नाईक प्रशिक्षण व विकास प्रबोधिनी नागपुरातील वनामती परिसरात स्थापन करणे त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद, केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त खर्चाने राष्ट्रीय स्तरावर मोठय़ा प्रमाणात कृषी मेळावा घेण्याची मागणी केली असून ५ कोटी रुपयांची तरतूद आहे. तसेच नागपुरात विद्यार्थिनींसाठी वसतिगृह बांधणे, मॉरिस कॉलेजमधील वसतिगृहाचे नूतनीकरण आणि सौंदर्यीकरण  करण्यचीही मागणी अनिल देशमुख यांनी केली आणि यासाठी २ कोटी रुपये राखून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.