* वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामबंद आंदोलन
* रुग्णांचे हाल
आश्वासन देऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (मॅग्मो) सोमवारपासून सुरू केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण कामकाज ठप्प झाले. आरोग्य विभागाने वैद्यकीय सेवा सुरळीत राखण्यासाठी कंत्राटी पध्दतीने वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्याचा प्रयत्न केला. तथापि, संबंधितांनी देखील ‘मॅग्मो’च्या आंदोलनास पाठिंबा दिल्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा पुरती कोलमडली. राज्य शासन आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातील वादात रुग्ण नाहक भरडले गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप संघटनेने केला. जून महिन्यात संघटनेने असहकार कामबंद आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिव्हाळ्याच्या मागण्यांची अंमलबजावणी दहा दिवसात करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संघटनेने सकारात्मक प्रतिसाद देऊन आपले आंदोलन मागे घेतले. पण, दुदैवाने या मागण्यांबाबत आजपर्यंत शासनाने काही केले नाही. इतकेच नव्हे तर त्या अनुषंगाने कोणता प्रस्तावही मंत्री मंडळासमोर ठेवला नाही.
या पाश्र्वभूमीवर, प्रमुख मागण्यांची प्रत्यक्षात अमलबजावणी न झाल्याच्या कारणावरून मॅग्मो संघटनेने राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. नाशिक जिल्ह्यात संघटनेचे सुमारे ५०० वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला.
मंगळवारी सकाळपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने करत आंदोलन सुरू केले. शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काम बंद केल्यामुळे रुग्णांचे हाल झाले. शेकडो रुग्णांना रुग्णालयात येऊन माघारी फिरावे लागले. ग्रामीण भागात स्थिती अधिकच बिकट झाली आहे.
रुग्णांना वेळीच उपचार मिळणे आवश्यक असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने अनेकांना खासगी डॉक्टरकडे धाव घेणे भाग पडले. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, त्या रुग्णांना कोणी वाली राहिला नसल्याचे दिसले. आरोग्य सेवा कोलमडू नये, यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्यांनी मॅग्मोच्या आंदोलनास पाठिंबा दिला. संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले नसल्याने रुग्णांची तपासणी व उपचाराचे काम पूर्णपणे ठप्प झाल्याचे संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश आहेर यांनी सांगितले.