नाशिककरांनी स्वस्त धान्य महोत्सवास प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे आणि अनेक जणांनी दरवर्षी असा उपक्रम राबविण्याची मागणी केल्याने यापुढे एप्रिल महिन्यात एकदा व दिवाळीआधी याप्रमाणे वर्षांतून दोन वेळा धान्य महोत्सव भरविण्याचा मनोदय मनसेचे आ. वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक यांनी व्यक्त केला.
मनसेच्या वतीनेयेथील डोंगरे वसतिगृह मैदानात १ मेपासून आयोजित स्वस्त धान्य महोत्सवाचा समारोप गुरुवारी झाला. महोत्सवास प्रतिदिन सुमारे १५ ते १६ हजार नाशिककरांनी भेट दिली. ‘ना नफा’ तत्त्वावर भरविण्यात आलेल्या या महोत्सवात बाजारभावापेक्षा सर्व प्रकारचे धान्य कमी किमतीत, स्वच्छ व उच्च प्रतीचे असेल, अशी काळजी महोत्सवाच्या संयोजकांनी घेतली. महोत्सवात शेतकरी व बचत गटांच्या महिलांना गाळे मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. समारोपात ४५ गाळेधारकांचा मनसेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. काही गाळेधारकांनी मनोगत व्यक्त करताना पुढील उपक्रमासही आपला असाच पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली. महोत्सवात दिंडोरी येथील करंजी व इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील सेंद्रिय गूळ, शिरपूरचे हरभरे, सोमेश्वर कंपनीचे लोणचे, उन्हाळी कांदा, रत्नागिरीचे हापूस आंबे, फणस, मालेगावचे कलिंगड, घरगुती मांडे, मूगभजी, कचोरी यांनाही विशेष मागणी होती. सचिन ठाकरे यांनी आभार मानले. धान्य महोत्सव भरविण्यामागे राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संकल्पना कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सचिन कुलकर्णी यांनी केले.