हक्काचे मतदार, कार्यकर्त्यांचे जाळे असतानाही गटबाजीचा विळखा, दुबळय़ा व राष्ट्रवादीधार्जिण्या नेतृत्वामुळे तीन तेरा वाजलेल्या शहर काँग्रेसने लोकसभा-विधानसभा निवडणुका ‘स्वबळावर’ लढवाव्या लागतील, अशी शक्यता गृहीत धरून तयारीला सुरुवात केली आहे. विस्कळीत यंत्रणा, हेवेदावे व सक्षम उमेदवारांचा अभाव असल्याने निवडणुकीत आपला निभाव लागेल का, अशी धास्ती काँग्रेस वर्तुळातच आहे. राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसची धडपड सुरू असून अजितदादांशी दोन हात करणारे नेतृत्वच काँग्रेसमध्ये नसल्याचे स्पष्टपणे दिसते आहे.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रदेश काँग्रेसने ‘पायाभूत’ कामांना सुरुवात केली. बूथ प्रतिनिधी, मतदार याद्यांचे सव्र्हेक्षण, पदाधिकारी तसेच निरीक्षकांची नियुक्ती आदींचे नियोजन सुरू केले. त्यानुसार शहर काँग्रेसने चिंचवड, िपपरी व भोसरी या विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मावळ लोकसभेसाठी केंद्रीय निरीक्षक व आमदार केवलसिंह धिल्लन यांनी पनवेलला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व तेथील राजकीय परिस्थितीची माहिती अहवालाद्वारे दिली. मावळ व तीनही विधानसभा मतदारसंघांत, येथील तगडय़ा स्पर्धेत तग धरू शकेल, असे सक्षम उमेदवार काँग्रेसकडे आहेत का, असा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. हक्काचे मतदार व कार्यकर्त्यांची भक्कम फळी असली, तरी खंबीर नेतृत्व नाही. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांना वाली राहिला नाही. नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात नाही, जुन्यांना किंमत नाही. पक्षात असलेली मरगळ दूर होईल, असे काही घडताना दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष फिरकत नाही, तर मुख्यमंत्री लक्ष घालत नाहीत, संपर्कमंत्र्यांचाच संपर्क नाही, सत्ता असून कामे होत नाहीत, अशी खदखद काँग्रेसमध्ये आहे.
अजितदादांच्या प्रभावामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने पळवला. हातात हात व पायात पाय घालण्याचे राजकारण करत राष्ट्रवादीचे तीनही आमदार निवडून आणून पवारांनी बारामतीचे डावपेच दाखवून दिले असल्याने काँग्रेसची पुढील वाटचाल खडतरच आहे. मागील वेळी मावळ लोकसभेसह तीनही विधानसभा मतदारसंघांची मागणी काँग्रेसने केली होती. मात्र, चिंचवड व िपपरीसाठी खरा आटापिटा होता. नाटय़मय व अर्थपूर्ण घडामोडीनंतर शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासाठीच चिंचवड काँग्रेसला मिळाला. आताही त्याच मतदारसंघांवर काँग्रेसचा डोळा असून तशी मागणी रेटण्यास
सुरुवात झाली आहे. एकीकडे निवडणुकांसाठी शड्डू ठोकले जात असताना पक्षांतर्गत टोकाला गेलेली धुसफूस रोखण्याची उपाययोजना होत नाही. आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे कसलेही नियोजन नाही.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2013 रोजी प्रकाशित
गटबाजी, विस्कळीत यंत्रणा अन् काँग्रेसची निवडणुकांची तयारी!
हक्काचे मतदार, कार्यकर्त्यांचे जाळे असतानाही गटबाजीचा विळखा, दुबळय़ा व राष्ट्रवादीधार्जिण्या नेतृत्वामुळे तीन तेरा वाजलेल्या शहर काँग्रेसने लोकसभा-विधानसभा निवडणुका ‘स्वबळावर’ लढवाव्या लागतील, अशी शक्यता गृहीत धरून तयारीला सुरुवात केली आहे.
First published on: 18-01-2013 at 03:24 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Groupism disturbed system and congress ready for election