राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी तसेच इतर पदाधिकारी आणि ज्येष्ठ नेत्यांसाठी आयोजित ‘प्रितीभोज बैठक’ सुरू असताना पक्षांतर्गत गटबाजी उफाळून दोन गटांच्या नेत्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचे प्रकरण यवतमाळच्या राजकीय वर्तुळात जोरदार चच्रेचा विषय झालेला आहे.
घाटंजी तालुक्यातील शिरोली या आपल्या गावी राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर यांनी राकाँच्या पदाधिकाऱ्यांची व नेत्यांची एक बठक आयोजित केली होती. या बठकीला माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावरच निवडणुका लढवल्या पाहिजेत, अशी भूमिका राकाँ नेते अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक तसेच आमदार संदीप बाजोरिया यांनी जाहीरपणे घेतले असताना आणि या भूमिकेला अधिकतम नेत्यांनी समर्थन दिले असताना अण्णासाहेब पारवेकर यांनी घाटंजी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती केली होती. अण्णासाहेब पारवेकरांची ही कृती पक्षविरोधी असल्याचा आरोप आमदार संदीप बाजोरिया यांनी केला आहे.
अण्णासाहेब पारवेकर यांचे कार्यकत्रे तसेच घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश डंभारे यांनी या बठकीत अण्णासाहेब पारवेकरांचे काही प्रस्ताव आमदार संदीप बाजोरिया यांच्याजवळ मांडले तेव्हा पारवेकरांचे कोणतेही काम राष्ट्रवादी करणार नाही कारण पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षात महत्त्व नाही, असे आमदार बाजोरीया यांनी स्पष्ट बजावले. तेव्हा आमदार बाजोरिया आणि प्रकाश डंभारे यांच्यात जोरदार हमरीतुमरी होऊन प्रकरण अक्षरश: हातघाईवर आले. प्रदेश सरचिटणीस नाना गाडबले यांनी आमदार संदीप बाजोरीया यांना बाजूला नेले तर इतरांनी डंभारे यांना आवरले. त्यामुळे हाणामारी टळली. या गोंधळातच बठक आटोपती घ्यावी लागली.
बठकीला मंत्री मनोहर नाईक, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोणकर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, विजय पाटील चोंढीकर, आर.डी. राठोड, नरेश ठाकूर, सुरेश चिंचोळकर, लोकेश इंगोले आदी नेते व पदाधिकारी हजर होते.
या घटनेने अस्वस्थ झालेलेआमदार बाजोरिया लगेचच नागपूरला अजित दादा पवार यांच्या स्वागतासाठी निघून गेले. गंमत म्हणजे हा प्रकार सुरू असताना राकाँचे मंत्री आणि इतर नेते यांच्यासमोर अण्णासाहेब पारवेकरांबाबत कोणती भूमिका घ्यावी हा प्रश्न आवासून उभा झाला. अजित दादा पवार यांच्यासमोर आता या पक्षांतर्गत विरोधकांची कैफियत मांडण्यात येईल, असे समजते.