जिल्ह्यात वर्षभरात तिसऱ्यांदा अस्मानी संकट ओढवल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला. जून ते जुलै, नंतर ऑगस्ट ते सप्टेंबर आणि आता रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, केळी व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या आधी पावसानेच झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नसताना ताज्या गारपिटीने पिकांची पुरती वाट लावली आहे. आता प्रशासनाकडून पुन्हा पीक नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश निघाले आहेत. जिल्ह्यात जून-जुलै दरम्यान २० हजार ७५८ हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीचा अहवाल राज्य सरकारकडे पोहोचत नाही, तोच ऑगस्टमध्ये अतिवृष्टी व सप्टेंबर-ऑक्टोबरअखेर १ लाख ५ हजार ९२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, मात्र सुरुवातीच्या २० हजार हेक्टर क्षेत्र नुकसानीच्या अहवालावरून सरकारने १० कोटी ३८ लाख निधी दिला. तो बाधित शेतकऱ्यांना वितरित झाला. मात्र, १ लाख ५ हजार ९२२ हेक्टरपकी केवळ २० हजार हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा निधी मिळाला. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून ४३ कोटींवर निधीची आवश्यकता आहे.
सुरुवातीला झालेल्या पीक नुकसानीचा मोबदला मिळावा, या प्रतीक्षेत शेतकरी असताना कापसाचे पीक लाल्या रोगाच्या विळख्यात सापडले. त्यामुळे कापसाला उतारा कमी येत असल्याने शेतकऱ्यांनी हे पीक मोडून गहू, ज्वारीसारख्या रब्बी पिकांचे नियोजन केले. ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा, ३९ हजार ५२० हेक्टर गहू व २६ हजार ४५९ क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी केली होती. परंतु रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीने िहगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांत पिकांचे बरेच नुकसान झाले.
औंढा नागनाथ तालुक्यात संत्रा व मोसंबी, तर वारंगाफाटा परिसरात केळीचे नुकसान झाले. बाळापूर भागात कामठा, येलकी, शेवाळा, िशदगी, पोत्रा या ठिकाणी शेतातील पिकांसोबतच अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने कृषी विभाग व तलाठी मंडळ अधिकारी यांना सर्वेक्षणाबाबत आदेश दिले, तर कृषी विभागाने प्रथमदर्शनी झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यात येणार असल्याचे अधीक्षकांनी कृषी अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2014 रोजी प्रकाशित
आधीची भरपाई लटकली, नव्याने सर्वेक्षणाचे आदेश!
रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी, केळी व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. या आधी पावसानेच झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नसताना ताज्या गारपिटीने पिकांची पुरती वाट लावली आहे.

First published on: 26-02-2014 at 01:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hailstorm again erratic rain hingoli