शहरातील रविवार पेठमधील सुंदर नारायण मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने २३ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘हरिहर भेट’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सचिव राजेश परदेशी यांनी दिली आहे. १७ वर्षांपासून वैकुंठ चतुर्दशी (देव दिवाळी)च्या दिवशी हा महोत्सव पार पडतो. महोत्सवानिमित्ताने आठ दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी खास नाशिककरांसाठी ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सायकांळी सात ते दहा या दरम्यान स्वरसुगंध निर्मित ‘स्वरगंगेच्या काठावरती’ ही स्वर यात्रा प्रा. नरेंद्र टोंगळे व अपर्णा देशपांडे सादर करणार आहेत. ‘जादुगार ए. सी. सरकार का मायाजाल’ हा मॅजिक शो शनिवारी सादर होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर आधारित ‘अबतक बच्चन’ हा गीतांचा कार्यक्रम नितिनकुमार सादर करणार आहेत. विजय महंत आणि कलाकार यांचा ‘साई संगीत महिमा’ हा संगीत कार्यक्रम सोमवारी होईल. रा. ९.३० वाजता आनंदयात्री महिला मंडळ प्रस्तुत ‘भजनसंध्या’ विणा केळकर सादर करतील. तर १२ वाजता ‘हरिहर भेट सोहळा’ पार पडणार आहे. मंगळवारी मराठी चित्रपट संगीताची ‘गंध फुलांचा’ ही मैफल नंदकुमार देशपांडे सजवतील. गायक सुनील आव्हाड, राजेश परदेशी, रिटा डिसुजा हे ‘साज और आवाज’ हा जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर करतील. तर गुरुवारी ‘भक्तीरंग’ हा कार्यक्रम होईल. महोत्सवा दरम्यान, निबंध, चित्रकला, फेस पेन्टींग, रांगोळी, या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९९२१८६३०५८ या क्रमांकावर संपर्क साधावा. शुक्रवारी महाप्रसादाने महोत्सवाची सांगता होणार असून भाविकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष महेश थोरात, अनिल देवकर यांनी केले आहे.