आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आरोग्य विद्यापीठाचे योगदान मोलाचे राहणार असल्याचे विद्यापीठातर्फे आयोजित तीनदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. अरुण जामकर आणि साहाय्यक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या कार्यशाळेत व्यासपीठावर नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. संजीव भोई, कुलसचिव डॉ. आदिनाथ सूर्यकर, साहाय्यक पोलीस आयुक्त पंकज डहाणे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. जामकर यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातून देखील लाखोंच्या संख्येने भाविक येणार असल्याने त्या वेळी योग्य नियोजन राहण्यासाठी प्रशासनातर्फे काळजी घेतली जात असल्याची माहिती दिली.
आरोग्य विद्यापीठाने नेहमीच आपली सामाजिक बांधिलकी समजून नाशिककरांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आपत्तीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना योग्य वेळी मदत करता आल्यास त्यांचे प्राण वाचविणे आपणास शक्य असते. यासाठी आवश्यक प्रशिक्षण आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. मागील कुंभमेळ्यातील कटू अनुभव टाळण्यासाठी विद्यापीठातर्फे आगामी कुंभमेळ्यात नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्यासाठी या विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यशाळेत आपत्कालीन परिस्थितीत आपण कोणत्या प्रकारे अत्यावश्यक वैद्यकीय उपचार करू शकतो याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नवी दिल्ली येथील आपत्कालीन सुविधा विभागाच्या डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांना प्रथमोपचाराची माहिती असल्यास त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये करता येणे शक्य आहे. यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून अधिकाधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहनही कुलगुरूंनी केले.
साहाय्यक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी आगामी कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनात विद्यापीठाचे योगदान मोलाचे राहणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या प्रचंड संख्येचे नियोजन करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आपण सर्वानी आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. सर्वानी समन्वयाने कार्य केल्यास हे शक्य होणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी नमूद केले.
प्रास्ताविक डॉ. धनंजय सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्निल तोरणे यांनी केले.