नागपूर विभागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असून मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. विभागात अतिवृष्टीने ३७ लोकांचे बळी घेतले असून २२ हजारांवर घरांचे नुकसान झाले आहे. ५० वर गुरे मृत्युमुखी पडली असून अडीच लाख हेक्टरमधील पिकांची हानी झाली आहे.
विभागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे काम अद्यापही सुरूच आहे. अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्य़ात ८, वर्धा १३, चंद्रपूर १२, भंडारा १,  गडचिरोली १ आणि गोंदिया जिल्ह्य़ात २ बळी घेतले आहेत.
पावसामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली जात असून आतापर्यंत ४० लाख, ४४ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. विभागात ११ हजार, ६३९ घरांचे अंशत: तर १० हजार ६८९ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्य़ात ९,४०६, वर्धा ४,७२६, भंडारा ३८०, गोंदिया १, २१२, चंद्रपूर ४, ६८४ आणि गडचिरोली जिल्ह्य़ात ९२० घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.  विभागात ५० वर गुरांचा मृत्यू झाला असून गुरांच्या मालकांना साडेतीन लाखांची मदत देण्यात आली.
अतिवृष्टीमुळे विभागात जवळपास अडीच लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन व धान पिकांची मोठी हानी झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्य़ांतील नुकसानाबाबतच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून गडचिरोली जिल्ह्य़ातील सर्वेक्षणाची आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नाही.
नागपूर जिल्ह्य़ातील १६९ हेक्टर पीक क्षेत्राखालील जमीन खरडून गेली आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे विभागातील प्रकल्पांतील जलसाठा झपाटय़ाने वाढला आहे. विभागातील मोठय़ा १९ प्रकल्पांपैकी १०, मध्यम ४० पैकी २३ प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. विभागात शंभरावर लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नाले व नद्यांना आलेल्या पुराचा अनेक गावांना तडाखा बसला. रस्ते आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.