अतिवृष्टीग्रस्त विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ात धानाची लागवड आता संपली असून पीक प्रारंभीच्या अवस्थेत असल्याने सध्याच्या वातावरणाचा परिणाम म्हणून गादमाशी, खोडकिडा आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत या कीडीचे लक्षण तुरळक प्रमाणात असले तरी सतत ढगाळ वातावरणाचा जोर कायम राहिल्यास विदर्भातील धानपट्टा कीडीच्या पुरत्या विळख्यात सापडण्याचा इशारा कृषीतज्ज्ञांनी दिला आहे. आधीच अतिवृष्टीचा तडाखा बसलेला शेतकरी नव्या संकटामुळे कोलमडला असून पिकांवरील कीडींच्या नायनाटासाठी त्याला अतिरिक्त खर्च करणे आता भाग पडणार आहे. गादमाशी ही डासासारखी दिसणारी असून झाडाच्या बेच्याजवळील भागावर अंडी घालते. अंडातून निघालेली अळी झाडाच्या अंकुरापर्यंत पोहोचून त्यावर हल्ला करते. कीड लागलेल्या रोपाची नीट वाढ होत नाही. रोपाची स्थिती कांद्याच्या हिरवट-पिवळ्या पातीसारखी होते. फुटव्यांच्या अवस्थेत या कीडीचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात होतो. याचा परिणाम धानाच्या ताटांची संख्या कमी होऊन उत्पादनही घटते. देवधानाची रोपटीदेखील धानाच्या वाढीसाठी घातक आहेत. अतिपावसानंतर बरेच दिवस उघाड पडल्यास गादमाशीबरोबरच लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सध्या या स्थितीतून विदर्भातील धानपट्टा जात आहे. यावर्षी विदर्भात लष्करी अळीचा फैलाव अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कृषीतज्ज्ञांनी म्हटले आहे. लष्करी अळी दिवसभर जमिनीलगत भाताच्या चोथ्यात किंवा जमिनीवर लपून राहते आणि रात्रीच्या वेळी झाडावरील पाने खाते. पिकांची नासाडी केल्यानंतर या अळ्या ओंब्या कुरतडतात. त्यामुळे भाताची गळ होऊन पीक नष्ट होते. या अळ्या एका शेतातून दुसऱ्या शेतात जाऊ शकतात, त्यामुळे सद्यस्थितीत धान पट्टय़ातील शेतकऱ्यांना पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झाला आहे
संग्रहित लेख, दिनांक 20th Aug 2013 रोजी प्रकाशित
अतिवृष्टग्रस्त धानपट्टय़ावर कीडींचे टांगती तलवार
अतिवृष्टीग्रस्त विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्य़ात धानाची लागवड आता संपली असून पीक प्रारंभीच्या अवस्थेत असल्याने सध्याच्या वातावरणाचा परिणाम म्हणून गादमाशी,
First published on: 20-08-2013 at 10:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain effected residents in problem