जैन धर्मीयांचे तीर्थस्थान असलेल्या भद्रावती येथे विदर्भातील सर्वाधिक भव्य केसरिया पाश्र्वनाथ प्रभूंच्या पुरातन मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम येत्या १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला आहे.
राजस्थानातील संगमरवरचा वापर करून १५ कोटीचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या मंदिराची भव्यता डोळय़ाचे पारणे फेडणारी आहे. साध्वी मणीप्रभाश्रीजी यांच्या प्रेरणेने हे मंदिर येथे उभे राहिले असून महोत्सवाच्या जय्यत तयारीला सुरूवात झालेली आहे.
अध्यात्म आणि स्थापत्यकलेचा सुंदर मेळा असलेल्या या मनमोहक मंदिराविषयी आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या महोत्सवाविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्यासह आयोजन समितीच्या सदस्यांनी मंदिर निर्माणाचा तसेच महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्याा व्यवस्थेचा आढावा घेतला. पाश्र्वनाथांच्या जुन्या मंदिराला जवळपास ९० वर्षांचा इतिहास आहे. या मंदिराची ख्यातीही मोठी आहे. देशातील जैन बांधव मोठय़ा श्रध्देने येथे येतात.
९० वर्षांपूर्वी दगड व चुन्याने निर्मित या मंदिराची अवस्था नजीकच्या काळात वाईट होत होती. गर्भगृह आणि शिखराला भेगा पडल्या होत्या. पावसाचे पाणी गळत होते. अशा वेळी १९९२ मध्ये चातुर्मासासाठी इकडे आलेल्या श्री मनीप्रभाश्रीजी म.सा. यांनी या मंदिराची डागडुजी करण्याची सूचना केली. त्यासाठी प्रयत्नही झाले. परंतु ते पुरेसे ठरले नाही असे लक्षात येताच श्री मणिप्रभाश्रीजी म.सा. आणि श्री कुमारपाल वि. शाह यांच्या मार्गदर्शनात नवे व भव्य मंदिर साकारण्याचे ठरले. त्यासाठी लागणाऱ्या सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी देशभरातील दानशूरांकडून जमा करण्यात आला. त्यात चंद्रपूर, वर्धा, नागपूर, हिंगणघाटसह विदर्भातील मान्यवरांचाही समावेश आहे. प्रेरणा आणि निधीचे पाठबळ मिळताच समितीने वेगाने कार्य सुरू केले. तरीही मंदिराचे सुरेख आणि मजबूत बांधकाम बघता मंदिर उभारणीसाठी जवळपास चौदा वर्षांचा कालावधी लागला.
मंदिराच्या भव्यतेसोबतच कलाकुसरीने ते अतिशय वेधक होण्यासाठी राजस्थानातील कारागीर दिवसरात्र झटले. जमिनीच्या खाली १४ फुट आणि जमिनीच्या वर १११ फुट असलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी धौलपूर येथील गुलाबी दगडाप्रमाणेच मकराना मार्बलचा उपयोग केला आहे. त्यामुळे नविन मंदिराला किमान पाचशे वर्षांपर्यंत काहीही होणार नाही, अशी माहिती मणीप्रभाश्रीजी यांनी दिली. आता हे भव्य मंदिर प्रतिष्ठा महोत्सवाची वाट बघत आहे.
या मंदिरात मूर्ती मात्र तीच ९० वर्षांपूर्वीची केसरिया पाश्र्वनाथ प्रभूंची राहणार आहे. त्यामुळे या महोत्सवाला प्राणप्रतिष्ठा नव्हे तर पुनर्प्रतिष्ठा महोत्सव असे म्हटले गेले आहे. महोत्सवाचे विधीवत महत्व पूज्या हेमप्रज्ञाश्रीजी म.सा.यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर मणिप्रभाश्रीजी यांनी अध्यात्मावर मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, जैन श्वेतांबर मंडल तीर्थच्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष निर्दोषकुमार पुगलिया, सदस्य सुरेंद्र खजांची, राजेंद्रकुमार गोलेच्छा उपस्थित होते. महोत्सवाला ८ फेब्रुवारी पासून सुरूवात होत असून १२ फेब्रुवारीला भव्य शोभायात्रा निघणार आहे.
त्यानंतर १३ रोजी प्रतिष्ठापना दिवस असेल, महोत्सवासाठी देशभरातून वीस हजाराच्या वर भाविक भद्रावतीत येणार असल्याने त्यांच्या राहण्यासाठी टेंट उभारण्यात आलेले आहे. तसेच सर्वाच्या भोजनाची व्यवस्था, शामियाना, आचार्य कुटी आणि सभागृहाची उभारणी करण्यात आलेली आहे.