नवरात्र उत्सवानिमित्त आग्याराम देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमासह भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष विनोद आष्टीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आग्याराम देवी मंदिरात चैत्र आणि अश्वीन महिन्यात उत्सव साजरे केले जात असून मोठय़ा प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. धर्मादाय आयुक्तांनी पाच वर्षांपूर्वी ९ विश्वस्तांची नियुक्ती केल्यानंतर मंदिराचा विकास करण्यात आला आहे. मंदिर परिसरात प्रशस्त सभागृह बांधण्यात आले. भाविकांसाठी पिण्याची पाण्याची, प्रसाधन गृहासह, प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून येणाऱ्या काळात हॉस्पिटल आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मोठे सभागृह बांधण्याचा संस्थेचा मानस आहे. आग्याराम मंदिरात नुकतेच ५७ किलोचे चांदीचे प्रवेशद्वार लावण्यात आले आहे. भाविकांनी दिलेल्या देणगीतून हे प्रवेशद्वाराची निर्मिती करण्यात आल्याचे आष्टीकर यांनी सांगितले.
नवरात्र उत्सवात भाविकांची होणारी गर्दी बघता सीसी टीव्ही कॅमेरे आणि पोलिसांसह खाजगी सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. देवीचे मंदिर असलेले सभागृह वातानुकुलीत करण्यात आले आहे. नवरात्रच्या पहिल्या दिवशी सुमारे अकराशे अखंड ज्योत पेटवण्यात येणार आहे. आग्याराम देवीचे मंदिर भोसलेकालीन असून त्याला चारशे वर्षांचा इतिहास आहे. मुळात या देवीचे रूप व्याघ्र वाहिनीचे आहे. प्राचीन आणि जागृत देवस्थान असल्यामुळे नवरात्र उत्सवात मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. अष्टमीला ४० ते ५० हजार भाविक मंदिरात येत असतात.
मंदिराच्या परिसरात अतिक्रमण..
आग्याराम देवी मंदिर परिसरातील मंदिराच्या मागच्या जागेवर कोठारी परिवारातील सदस्यांनी आणि त्या परिसरात राहणाऱ्या एका चौकीदाराने अतिक्रमण केले आहे, असा आरोप करून त्या संदर्भात न्यायालयात लढाई सुरू असल्याची माहिती मंडळाचे विश्वस्त सदस्य गिरीश व्यास यांनी दिली. धर्मादाय आयुक्तांनी ही मंदिराच्या मागची बाजू मंदिराच्या नावाने करून दिली आहे. त्या संदर्भातील कागदोपत्री व्यवहार झाला आहे तरीही कोठारी यांनी अतिक्रमण केले आहे. या संदर्भात महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासकडे तक्रार केली आहे मात्र त्यावर कारवाई केली जात नाही असेही व्यास यांनी सांगितले.