महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिर, अंबरनाथ आणि ठाण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील धार्मिक स्थळे, लेणी, किल्ले आणि राजवाडे हिंदू स्थापत्यकलेचे उत्तम नमुने असणाऱ्या अशा अनेक वास्तू महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये आढळतात. मात्र अशा धार्मिक वास्तूंचा स्थापत्यकलेच्या अंगाने विचार करणाऱ्या पुस्तकांची संख्या मराठीमध्ये फारशी नाही. त्यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी इतिहास संशोधक दाऊद दळवी यांनी भारतीय मुस्लीम स्थापत्यकलेच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हिंदू स्थापत्यशैलीचा वेध घेणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘भारतीय मुस्लीम स्थापत्यकला’ आणि दाऊद दळवी यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘माझे अंतरंग’ या पुस्तकांचे प्रकाशन शनिवार, ३ जानेवारी रोजी ठाण्यात होणार आहे. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आगामी संशोधन प्रकल्पांविषयी सांगितले.
भारतीय मुस्लीम स्थापत्यकलेवर मराठीत एकही पुस्तक नाही. त्यामुळे या विषयातील विद्यार्थी, अभ्यासक व तज्ज्ञांना तपशिलाची फार मोठी उणीव भासत होती. भारतातील मुस्लीम स्थापत्य विकासाचा आढावा प्राचार्य दाऊद दळवी यांनी त्यांच्या ‘भारतीय मुस्लीम स्थापत्यकला’ या पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकास छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे माजी संचालक पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांची प्रस्तावना आहे. शनिवार, ३ जानेवारी रोजी मावळी मंडळ सभागृह, ठाणे येथे या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. भारतातील मुस्लीम स्थापत्यकला या पुस्तकाबरोबरच दळवी यांचे आत्मचरित्र असलेले ‘माझे अंतरंग’ हे पुस्तकही त्याच वेळी प्रकाशित होणार आहे. प्राध्यापक ते प्राचार्य हा त्यांचा जीवनप्रवास तसेच दाऊद या नावामुळे झालेल्या त्रासाचाही उल्लेख त्यांनी या आत्मकथेत केला आहे. कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा उलगडाही त्यांनी आत्मचरित्रामध्ये केला आहे.
इंग्रजीमध्येही उपलब्ध..
प्रा. दाऊद दळवी यांचे भारतीय मुस्लीम स्थापत्यकला, माझे अंतरंग आणि लेणी महाराष्ट्राची (दुसरी आवृती) या तीन पुस्तकांचे प्रकाशन शनिवार, ३ जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे. ग्रंथालीतर्फे लेणी तसेच मुस्लीम स्थापत्यकला ही दोन पुस्तके लवकरच इंग्रजीतही प्रकाशित केली जाणार आहेत.