मागील वर्षी १ जून ते सप्टेंबरअखेर चार महिन्यांत जिल्हय़ात सरासरी ६५०.२९ मिमी (७३.०४ टक्के) पाऊस पडला. यंदा मात्र पावसाळय़ाच्या पहिल्या दोन महिन्यांतच सरासरी तब्बल ८१२.६८ मिमी (९२.२६ टक्के) पावसाने जिल्हय़ावर बरसात केली. जिल्हय़ात यंदा अतिवृष्टीने पिकांची मोठी हानी झाली. पिकांच्या नुकसानीचा अहवाल गुरुवापर्यंत सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी दिला.
जून व जुलै महिन्यांत अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील पिकांचे मोठे नुकसान झाले. १ जून ते ५ ऑगस्टदरम्यान जिल्हय़ात एकूण ४०६३.३९ मिमी पाऊस पडला. त्याची सरासरी ८१२.६८, तर टक्केवारी ९२.२६ आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत जिल्हय़ात ३८.९१ टक्के पावसाची नोंद झाली होती. हिंगोलीचे आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हय़ात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. विदर्भाच्या धर्तीवर हिंगोलीतील शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी आमदार जयप्रकाश दांडेगावकर, राजीव सातव यांनीही मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांची भेट घेतली. या मागणीची राज्य सरकारने दखल घेतली.
कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव, तसेच विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्हय़ातील तहसील व कृषी विभागास संयुक्त दौरा करून पीकनुकसानीचे पंचनामे करून ८ ऑगस्टपर्यंत अहवाल पाठविण्याचे आदेश दिले. मुदतीनंतरचा अहवाल स्वीकारला जाणार नसल्याची तंबीही दिली. बाधित क्षेत्राची माहिती पाठविताना फक्त ३१ जुलैपर्यंतच्या माहितीचा समावेश असावा. १ ऑगस्ट किंवा त्यानंतरच्या अतिवृष्टी व पुराच्या संदर्भात सरकारच्या स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी सांगितले.