चित्रपटात एखादे पात्र सिगारेट शिलगावताना दिसले रे दिसले की लगेच रुपेरी पडद्यावर ‘धूम्रपान हानिकारक आहे’ असा संदेश दिसू लागतो. मध्यंतरात चित्रपटांच्या जाहिराती न दाखवता धूम्रपानामुळे कर्करोगासारखा भयानक आजार होतो, हे सांगणारी जाहिरात झळकते. अगदी छोटय़ा पडद्यावरही चित्रपट दाखवताना हे नियम कटाक्षाने पाळले जातात. भारतातील सर्वभाषिक चित्रपटकर्त्यांना आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हा नियम पाळावा लागतो. पण, हॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता, लेखक-दिग्दर्शक वुडी अॅलनने हा नियम पाळण्यास नकार दिला असून त्यासाठी त्याने आपला ‘ब्ल्यू जस्मिन’ हा चित्रपट भारतात न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रेक्षक आपल्या पदरचा पैसा खर्च करून आपली सुंदर कलाकृती बघण्यासाठी येतात. एखाद्या छान चित्रपटाच्या मध्येच अशाप्रकारे जाहिरात दाखवावी, हे आपल्याला मान्य नाही. त्यामुळे आपण भारतातील चित्रपटगृहामधून चित्रपट काढून घेत असल्याचे वुडी अॅलनने म्हटले आहे. वुडी अॅलनच्या या निर्णयामुळे चित्रपटाचे वितरक असलेल्या पीव्हीआर समूहाने अखेरच्या क्षणी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटांचा समाजमनावर जास्त प्रभाव पडतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा चित्रपटांमध्ये धूम्रपानाचे दृश्य दाखवले जाईल तेव्हा तेव्हा धूम्रपान हानिकारक असल्याची सूचना दाखवण्यात आली पाहिजे, असा नियम चित्रपटगृह मालकांसाठी आरोग्य मंत्रालयाने सक्तीचा के ला आहे. आम्ही नियमाने बांधलेलो आहोत. त्यामुळे वुडी अॅलनचा निर्णय मान्य करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असे सांगत यावर आपण काहीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, असे पीव्हीआरच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
वुडी अॅलनच्या या निर्णयावर हिंदी चित्रपटसृष्टीतही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एकीकडे अभिनेता इरफान खान याने वुडी अॅलनने स्वत:च एक धूम्रपानविरोधी जाहिरात करून ती लावण्याचा प्रयत्न करावा, असे सांगत या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे शूजित सरकार, ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या ‘द गुड रोड’चे दिग्दर्शक ग्यान कोरिया यांनी कोणीतरी असा पवित्रा घेणे गरजेचेच होते, असे म्हणत वुडी अॅलनच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. तर बिजॉय नम्बियारसारख्या दिग्दर्शकाने मात्र वुडी अॅलनचा निर्णय काहीही असला तरी अशा जाहिरातींची आपल्या समाजाला गरज आहे आणि दिग्दर्शक म्हणून चित्रपटात अशी सूचना करणारी जाहिरात प्रदर्शित करण्यात आपल्याला काहीही वावगे वाटत नसल्याचे म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2013 रोजी प्रकाशित
हॉलिवूड दिग्दर्शक वुडी अॅलनचा ‘ब्ल्यू जस्मिन’ भारतातून बाहेर
चित्रपटात एखादे पात्र सिगारेट शिलगावताना दिसले रे दिसले की लगेच रुपेरी पडद्यावर ‘धूम्रपान हानिकारक आहे’ असा संदेश दिसू लागतो.

First published on: 12-10-2013 at 06:56 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hollywood director woody allan blue jasmina out of india