रमजान ईदच्या प्रार्थनेनंतर करवीर नगरीत मुस्लीम बांधवांनी शहिद कुंडलिक माने व हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. या उपक्रमानंतर शहर व जिल्ह्य़ामध्ये मुस्लीम बांधवांनी शुक्रवारी रमजान ईद परंपरागत पध्दतीने उत्साहात साजरी केली.
प्रतिवर्षांप्रमाणे मुस्लीम बोर्डिंगच्या क्रीडांगणावर शुक्रवारी सकाळी साडे नऊवाजता ईद उल फित्रनिमित्त सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मुफ्ती इर्शाद कुन्नूरे यांनी पहिल्या जमातीचे नमाज व खुतबा पठण केले. त्यानंतर शहरातील अन्य मशिदींमध्ये मानव कल्याण व विश्वशांतीसाठी नमाज पठण करण्यात आले.नमाज पठणानंतर परस्परांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यंदा रमजान ईद व क्रांतिदिन एकत्र आला आहे. यामुळे नमाज पठणानंतर हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. पाकिस्तानी सैन्यांच्या गोळीबारात वीरगती प्राप्त झालेले कुंडलिक माने अमर रहे असा फलक घेऊन घोषणा देण्यात आल्या. पाकिस्तानविषयीचा संताप मुस्लीम बांधवांनी व्यक्त केला. जला दो जला दो पाकिस्तान जला दो, दुध मांगे तो खीर देंगे, काश्मीर मागोगे तो चिर देंगे, अशा घोषणा देतानाच पाकिस्तानच्या ध्वजाची होळी नगरसेवक आदिल फरास व इतरांनी केली.
नमाज पठणानंतर मुस्लीम बांधव दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले. तेथे पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव, अपर पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी अजरेकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तिरंगा महल येथे मुस्लीम पंचायतीच्यावतीने क्रांतिदिनानिमित्त हुतात्म्यांना व पाकच्या हल्ल्यात शहिद झालेले कुंडलिक माने यांच्यासह पाच जवानांना आदरांजली वाहण्यात आली. ईद मिलन व अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती पंचायतीचे अध्यक्ष फारूक कुरेशी यांनी दिली. या वेळी हाजी एच.बी.पटेल, उमर फारूक मणेर, मुबारक मुल्ला, कय्युम खान, आर.एम.गवंडी,सिकंदर शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
सांगलीत नमाज पठण
सांगली-मिरज शहरात शुक्रवारी रमजान ईद मोठय़ा उत्साहाने साजरी करण्यात आली. शहराच्या विविध ठिकाणी असणाऱ्या मशिदीत नमाजपठण करण्यात आले. मुस्लीम बांधवांनी मिरजेतील ईदगाह मदान येथे सामुदायिक नमाजपठण केले.
ईदगाह मदानात मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, पोलीस अधीक्षक दिलीप सावंत, अपर अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान यांच्यासह माजी आमदार हाफिज धत्तुरे, प्रा. शरद पाटील आदींसह सामाजिक कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दिवसभर शहरात िहदू-मुस्लीम एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Aug 2013 रोजी प्रकाशित
हुतात्म्यांना श्रद्धांजली, पाकिस्तानचा निषेध
रमजान ईदच्या प्रार्थनेनंतर करवीर नगरीत मुस्लीम बांधवांनी शहिद कुंडलिक माने व हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवित पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.
First published on: 10-08-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homage to martyrs protest of pakistan