म्हाडाचे घर लागावे म्हणून वर्षांनुवर्षे प्रतीक्षा करायची, सोडतीत घर लागलेच तर पैसे जमविण्याची धावपळ करायची आणि सगळे सव्यापसव्य करून घर हाती आल्यानंतर सगळ्या आनंदावर विरजण पडावे हा योग पैसे भरून म्हाडाचे घर मिळालेल्या अनेकांच्या नशिबी येतो. याचे एकमेव कारण या घरांचा सुमार दर्जा. नवीन इमारतीमधील गळकी घरे, पोपडे निघालेल्या भिंती अशा अवस्थेतील या घरांच्या तुलनेत म्हाडानेच धारावीच्या पुनर्विकासासाठी बांधलेल्या आणि लाभार्थीना मोफत मिळणाऱ्या घरांची आलिशानता डोळ्यात भरते. चकचकीत फरशा, ग्रॅनाइटचा किचनकट्टा, हॉल आणि बेडरूममध्ये पोटमाळा आणि हवा-प्रकाश खेळता राहण्यासाठी मोठाल्या खिडक्या, ३०० चौरस फूट चटई क्षेत्रफळ आणि ‘वन बीएचके’ जागा असे दिमाखदार रूप या मोफत घरांचे आहे. धारावी प्रकल्पातील सेक्टर ५च्या पुनर्विकासासाठी राबवण्यात येत असलेला प्रयोगिक प्रकल्प आता वेगाने पूर्णत्वाच्या मार्गावर असून एप्रिल २०१४ पर्यंत या प्रकल्पातील सर्व ३५८ घरांचा ताबा ‘म्हाडा’कडे येणार आहे.
म्हाडाची घरे म्हणजे सुमार दर्जा हे समीकरणच बनून गेले आहे. अगदी नवीन इमारतींमध्येही गच्चीतून अथवा वरच्या मजल्यावरून पाणी गळणे ही सामान्य बाब असते. भिंतींना ओल असणे, पोपडे पडणे, कोणी धावत गेल्यास हादरे बसणे अशी या नव्या इमारतींचीही दयनीय अवस्था असते. आणि वर या घरांसाठी सामान्यांनी लाखो रुपये मोजलेले असतात. या पाश्र्वभूमीवर धारावीतील सेक्टर ५ च्या पुनर्विकासासाठी बांधलेली मोफत घरे प्रकर्षांने उठून दिसतात.
‘म्हाडा’ धारावीत झोपु योजनेत इतक्या आलिशान आणि दिमाखदार घरांची बांधणी करू शकते. तर मग लाखो रुपये देऊन घर विकत घेणाऱ्यांना ‘म्हाडा’ चांगली व दर्जेदार घरे का नाही देऊ शकत? या घरांमुळे ‘म्हाडा’ही दर्जेदार सुविधा देऊ शकते, आकर्षक घरबांधणी करू शकते हे दिसून आले. मग जवळपास बिल्डरांच्याच दराने घर विकत असताना त्यांचा दर्जा इतका सुमार का? धारावीतील घरांच्या दर्जाबाबत दिसणारी ‘म्हाडा’ची इच्छाशक्ती सर्वसामान्यांच्या घरांचा दर्जा टिकवताना का दिसत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
धारावी सेक्टर ५चा पुनर्विकास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘म्हाडा’वर सोपवला आहे. त्यासाठी ३२१० चौरस मीटरच्या भूखंडावर प्रायोगिक प्रकल्प राबवण्यात येत असून त्याचे काम ‘बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले आहे. पार्किंगची जागा आणि वर १८ मजल्यांची इमारत. प्रत्येक मजल्यावर ३०० चौरस फुटांची २१ घरे असे या प्रायोगिक प्रकल्पाच्या इमारतीचे स्वरूप आहे. पैकी नऊ मजल्यांपर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले आहे. नमुना सदनिकाही तयार झाल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम फेब्रुवारी २०१३ अखेरीस सुरू झाले आणि आता जवळपास निम्मी इमारत बांधून पूर्ण झाली आहे. ‘थ्री एस प्रीफॅब’ या बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून काम सुरू असल्याने वेगात काम सुरू आहे.
या १८ मजली इमारतीसाठी ८० मीटर उंच बांधकाम करावे लागणार आहे. पण विमानतळ प्राधिकरणाकडून त्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे काम अडणार नाही का असे विचारता, वांद्रे-कुर्ला संकुलात विमानतळ प्राधिकरणाने ८४ मीटर उंचीच्या इमारतीला परवानगी दिली आहे. धारावीतील ही इमारत त्याच रेषेत येते. त्यामुळे आम्हालाही परवानगी मिळेल. याबाबतची एक बैठक दिल्लीत झाली आहे. त्यात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे, असे सांगण्यात आले.
घरांची व इमारतीची वैशिष्टय़े
*उन्हाळय़ात बाहेरच्या तापमानापेक्षा घरातील
    तापमान सुमारे सात अंश सेल्सिअसने कमी राहील.
* नामांकित कंपनीच्या पाच लिफ्ट
* बाथरूम आणि शौचालय स्वतंत्र
* आगीत दोन तास टिकून राहील असा
    अग्निरोधक  ‘स्पेशलाइज्ड गॅल्व्हनाइज्ड स्टील’ने
     तयार केलेला दरवाजा
* जमिनीवर आलिशान टाइल्स