सैन्यदलासारखी धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता अन्यत्र कुठेही नाही. त्या सैनिकांप्रमाणेच आपण भारतीय संस्कृती अंगीकारली पाहिजे. जवानांना धर्म, जात, प्रांत विसरून फक्त देश हा आपला वाटत असतो. त्या देशाच्या सीमेचे रक्षण हेच त्यांचे कर्तव्य असते. अशी मानवाधिष्ठित राष्ट्रीयत्वाची संकल्पना प्रत्येक भारतीयाने स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लक्ष फाऊंडेशनच्या अनुराधा प्रभुदेसाई यांनी  ‘कारगिल युद्धाची शौर्यगाथा’ सांगताना केले.
लक्ष्य फाऊंडेशन व शिवबा रायफल्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने ‘ऋणानुबंध सैनिकांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणच्या अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले होते. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी अनुराधा प्रभुदेसाई यांनी आपले विचार व्यक्त केले. नकाशावरच देशाचे दोन छोटे भाग होणे यांसारखे दुसरे लांच्छनास्पद कृत्य कोणतेच होऊ शकत नाही. सध्या पाठय़पुस्तकातील धडय़ातूनच अरुणाचल प्रदेशसारखे भाग गायब केले जात आहेत. यासारखी वाईट आणि दुर्दैवी अशी गोष्ट नाही.
याचे आपल्याला काहीच वाटत नाही. गेल्या काही वर्षांत समाजाच्या बदललेल्या मानसिकतेचा हा परिणाम आहे. आपल्या देशात एखादा राजकीय पुढारी मार खातो, तेव्हा त्याच्या निषेधार्थ बंद पाळले जातात. मात्र शहीद सैनिकांची नावे मात्र आपल्याला माहीत नसतात.
सीमेवर शहीद होणाऱ्या सैनिकांच्या बातम्या आम्ही वाचत नाही तर ‘बॉलीवूडच्या’ सिताऱ्यांच्या गोष्टी खमंगपणे चघळतो. आपण आपल्या मनाचीच कवाडे बंद करून धनाची कवाडे उघडी केली आहेत, याबद्दल प्रभुदेसाई यांनी खंत व्यक्त केली.  
कारगिल युद्धाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, १८ हजार फुटांहून उंच ठिकाणी, जिथे वर्षांतले नऊ महिने बर्फ पडतो, तिथे अतिशय प्रतिकूल वातावरणात भारतीय सैनिक डोळ्यांत तेल घालून देशाचे रक्षण करीत असतात. त्या वेळी आपण घरामध्ये निश्चित झोपू शकतो. त्यामुळे सैनिकांच्या कार्याचे भान प्रत्येकालाच असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय लष्कर सुसंस्कृत असून लष्कर हेच राष्ट्र उभारणी करीत असते. सध्या सैन्यात ११ हजार जागा रिक्त आहेत.  सैन्यदलासारखे दुसरे नोबेल प्रोफेशन नाही. आजच्या तरुणांना भूतकाळाचे भान, वर्तमानकाळाचे धोरण आणि भविष्याची स्वप्ने देण्यासाठी लक्ष्य फाऊंडेशन कार्यरत आहे, असेही त्यांनी सांगितले.  कारगिल युद्धात कॅ. सौरभ कालिया, लेफ्टनंट मनोज पांडे, कॅ. विक्रम बात्रा, योगेंद्रसिंग यादव, संजय कुमार, विनय कुमार थापा, पद्मपाणी यांच्या शौर्याच्या कथा त्यांनी उपस्थितांना सांगितल्या.