सात महिन्यांनंतर गुन्हा दाखल
ठाणे येथील दिवा परिसरात सात महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालची मूळ रहिवाशी असलेल्या एका विवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्यात तिचा मृत्यू झाला होता. सासरच्या मंडळीने हुंडय़ासाठी केलेल्या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पश्चिम बंगाल येथील न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील तारेकश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास करण्यासाठी हा गुन्हा मुंब्रा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पश्चिम बंगालमध्ये राहणारी सीमा प्रतीहार हिचा विवाह सिमंता राजकुमार पाल याच्यासोबत झाला होता. लग्नामध्ये हुंडा म्हणून ५० हजार रोख व पाच तोळे सोन्याचे दागिने सीमाच्या वडिलांनी दिले होते. लग्नानंतर सीमा पश्चिम बंगाल येथील घनश्यामपूर येथे सासरी रहावयास गेली. तसेच सिमंता आणि त्याचा भाऊ व्यवसायानिमित्ताने ठाणे शहरातील दिवा भागात राहत होते. दरम्यान, सिमंता दिवा भागात राहात असताना सासरची मंडळी सीमाकडे एक लाख रुपयांची मागणी करून तिला त्रास देऊ लागली. मात्र, वडिलांची परिस्थिती गरीब असल्याने सीमाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर सिमंता सीमाला दिवा येथे घेऊन आला व काही दिवसांतच पुन्हा तिचा हुडय़ांसाठी छळ सुरू झाला. दरम्यान, या जाचाला कंटाळून तिने १६ मार्च २०१३ रोजी राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सीमाचे वडील स्वपन प्रतीहार यांनी पश्चिम बंगाल येथील अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांकडे तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणी तारकेश्वर पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही घटना दिवा भागात घडल्याने पश्चिम बंगाल न्यायालयाने याबाबत ठाणे न्यायालयाला माहिती दिली होती. त्यामुळे ठाणे न्यायालयानेही या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे आदेश मुंब्रा पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.