स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असून त्याची सुरुवात घरापासून करावयाची असते व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता होणार नसून त्यासाठी महिलांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलामुलींमध्ये भेद न करता समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने होईल, असे वक्तव्य प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांनी केले.
सरदार पटेल महाविद्यालयात ‘जागर जाणिवांचा’ या अभियानांतर्गत आयोजित ‘स्त्री-पुरुष समानता’ या विषयावरील व्याख्यानात त्या प्रमुख वक्तया म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. जे. ए. शेख, उपप्राचार्य डॉ. एल. व्ही. शेंडे, डॉ. राजेश इंगोले, प्रा. यू. एम. खंडाळे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून डॉ. जे. ए. शेख यांनी या कार्यक्रमामागील भूमिका विशद केली. अध्यक्षीय भाषणातून शांताराम पोटदुखे यांनी अशा व्याख्यानांचे आयोजन महत्त्वाचे असून त्यातून व्यक्तीगत जीवनातही उत्तमरित्या प्रगतीचे मार्ग मोकळे होऊ शकतात. त्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. एस. पी. बन्सोड यांनी, तर आभार प्रा. उषा खंडाळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. पुर्णिमा मेश्राम, प्रा. डॉ. रक्षा धनकर, प्रा. शीतल बोरा, प्रा. स्वाती मानकर यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला प्राध्यापक आणि  विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.