सांगोला तालुक्यातील हंगीरगे येथे सासू, मेव्हणा, सासरे या तिघांचा खून केल्या प्रकरणी आरोपी विठ्ठल लांडगे यास जन्मठेपेची तर मेव्हणीच्या खुनाचा प्रयत्न केला म्हणून १० वर्षे तुरुंगवास व एक हजार रु. दंडाची अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एस. काकडे यांनी सुनावली. हंगीरगे येथे सुमारे चार वर्षांपूर्वी तिहेरी खुनाची घटना घडली होती. आरोपी विठ्ठल बाबुराव लांडगे याचा १९९९ मध्ये दिनकर बापूराव कसबे, सांगोला यांची मुलगी मोहिनीबरोबर विवाह झाला होता. विठ्ठल यास कालांतराने दारूचे व्यसन जडले. त्याने मोहिनीस त्रास देऊन ‘माहेरून २५ हजार रुपये घेऊन ये’ म्हणून तगादा लावला होता. यास कंटाळून मोहिनीने विठ्ठलविरोधात सांगोला पोलिसात तक्रार दाखल केली. त्याचा राग विठ्ठल याने मनात धरला होता.
२७ मे २००८ रोजी विठ्ठल चाकू घेऊन मोहिनीचे घरी जाऊन तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना भांडण सोडवण्यास आलेले सासू शामल कसबे, सासरे दिनकर कसबे व मेव्हणा गणेश कसबे या तिघांवर चाकूने वार करून ठार केले तर विठ्ठल याचे भांडण आवरू पाहणाऱ्या मेव्हणी वैशाली हिच्यावर वार करून तिला जखमी केले.