* सहा सुवर्ण पटकावणारे ज्येष्ठ धावपटू जानराव लोणकर यांची खंत

आंतरराष्ट्रीय खुल्या धावस्पर्धेत प्रौढ भारतीय धावपटू भारताचे नाव उज्वल करू शकतात, पण अशा ज्येष्ठ स्पर्धकांना कु णाचेही प्रोत्साहन मिळत नाही. पदरमोड करून स्पर्धेत सहभागी होणारे असे स्पर्धक आज सर्वाधिक वंचित ठरले आहेत, अशी व्यथा ज्येष्ठ धावपटू जानराव लोणकर यांनी व्यक्त केली.    
खुल्या धावस्पर्धेत यावर्षी पाच पदके मिळवून आताच हैदराबादच्या स्पर्धेत सहावे पदक खेचणाऱ्या जानराव लोणकर यांनी प्रौढांसोबतच प्रौढ खेळाडूंचेही नवे भावविश्व मांडले. विदेशातील प्रौढ धावपटूंना मागे टाकत सलग सहावे पदक प्राप्त करणाऱ्या लोणकरांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना शासनाच्या उदासीनतेवरही बोट ठेवले.    
वयाच्या ७३ व्या वर्षी स्पर्धेसाठी उत्सुक असलेले जानराव लोणकर निवृत्त पोलीस शिपाई
आहेत. व्यसनांपासून दूर, नियमित व्यायामाची आवड, शेतीची देखभाल, मोजकाच पण वक्तशीर आहार, हीच त्यांची उतारवयातील आरोग्याची व आर्थिक सुरक्षेची पुंजी आहे, पण उमेदही आहे अन् त्यामुळेच मैदानाचा मोहसुध्दा. जेथे कु ठे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय धावस्पर्धा होतात तेथे त्यांना मैदान खुणावते.
गेल्या २५ नोव्हेंबरला हैदराबादला आटोपलेल्या जंम्बो क्लाऊड मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी १० किलोमीटरचे अंतर एक तासात पूर्ण करून तृतीय पदक प्राप्त केले. गेल्या दहा वर्षांत त्यांच्या खात्यावर २६ पदकांची कमाई जमा झाली आहे. मधुमेह रुग्ण असलेल्या लोणकरांनी साखरेचे प्रमाण मर्यादेबाहेर वाढलेले असतांनाही पूर्ण केलेली दिल्ली मेरॅथॉनची शर्यत ही एक आश्चर्याची बाब समजली जाते.
 प्रसिध्दी, पैसा नव्हे, तर खेळाची पत सांभाळण्यासाठी त्यांची चाललेली धावपळ म्हणूनच विस्मयकारी ठरावी.
विदेशात सातत्याने अशा स्पर्धा होतात, पण त्यात सहभागी होण्याचा खर्च मोठा आहे. विदेशातील अनेक प्रौढ धावपटू भारतात येतात, पण त्यात हौसच अधिक असते. शारीरिक क्षमता नसते. उलट भारतीय धावपटू अधिक सक्षम असल्याचे दिसून आले आहे. त्यांना संधी मिळाली तर विदेशात भारताची पताका ते फ डकावू शकतात, पण आर्थिक खर्च झेपत नाही. माझ्यासारखीच स्थिती औरंगाबादच्या श्रीमती जोशी यांचीही आहे. त्या अंध आहेत, पण धावण्याची जिद्द मोठी आहे.  जानेवारी २०१३ मध्ये क्वालालंपूर येथील स्पर्धेत सहभागी होण्याची दोघांचीही इच्छा आहे. मी तर उतारवयात एकमेव आधार असणारी पदरची एक एकर शेती विकून सहभागी होण्याची तयारी ठेवली आहे, पण इतरांचे
काय, असा प्रश्न लोणकर यांचा
आहे.