गेल्या सव्वा वर्षांत शहरात झालेल्या १ हजार ५१६ रस्ते अपघातात ३७३ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजार ५०० जण गंभीर जखमी झाले. यावरून शहरात दररोज विविध अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी होत असल्याचे स्पष्ट होते. यात सर्वाधिक ७० जण रिंगरोडवरील अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.
वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांनी माहिती अधिकारात माहिती कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीवरून या बाबी उघडकीस आल्या आहेत. १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१४ या सव्वा वर्षांत शहरातील विविध भागात १ हजार ५१६ अपघात झाले. त्यात ३७३ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ५१३ जण जखमी झाले. यामध्ये पूर्व विभागात ३६३ अपघात झाले असून त्यात ८० जणांना आपले प्राण गमवावे लागले तर ३६६ व्यक्ती जखमी झाले. पश्चिम विभागामध्ये २६० अपघात झाले असून त्यात ६१ जणांचा मृत्यू झाला तर २५९ जण जखमी झाले. उत्तर विभागामध्ये १७० अपघात झाले असून ४० जण मृत्यूमुखी पडले तर १५६ जण जखमी झाले. दक्षिण नागपुरात २३० अपघात झाले असून त्यात ५३ जणांचा मृत्यू झाला, तर २३३ जण जखमी झाले. इंदोरा भागात ३०९ अपघात झाले असून ८६ जण मृत्युमुखी पडले. ३३३ जखमी झाले. एमआयडीसी विभागात १८४ अपघात झाले असून त्यात ५३ जणांना प्राण गमवावे लागले. तर १६६ जणांचा मृत्यू झाला.
याच कालावधित शहरातील रिंगरोडवर एकूण २४८ अपघात झाले असून त्यात ७० जण ठार झाले, तर २२२ जण जखमी झालेत. पूर्व विभागातील रिंगरोडवर झालेल्या १३६ अपघातात ३५ जण ठार झाले तर ११४ जण जखमी झाले. पश्चिम भागातील रिंगरोडवर २४ अपघात झाले असून त्यात ११ जणांना प्राण गमवावे लागले तर २४ जण जखमी झाले. इंदोरा भागात ५७ अपघात झाले असून २१ जण मृत्युमुखी पडले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भागातील रिंगरोडवर ३१ अपघात झाले असून त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. तर ३३ जण जखमी झाले. उत्तर आणि दक्षिण भागातील रिंगरोडवर एकही अपघात झाला नसून त्यात कुणीही मृत्युमुखी अथवा जखमी झाले नसल्याचे वाहतूक शाखेतर्फे सांगण्यात आले. रस्ते खराब असणे, वेगाने वाहन चालवणे, समयसूचकता न बाळगणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे, हलगर्जीपणा करणे आदी कारणे अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
रस्ते अपघातात सव्वा वर्षांत पावणे चारशे मृत्युमुखी
गेल्या सव्वा वर्षांत शहरात झालेल्या १ हजार ५१६ रस्ते अपघातात ३७३ जणांचा मृत्यू झाला, तर १ हजार ५०० जण गंभीर जखमी झाले.
First published on: 22-04-2014 at 07:44 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In one year three months 345 dead in road accident