पाच दिवसांत विविध पोलीस ठाण्यात ९ मुलींकडून तक्रारी दाखल
शहरात दिवसेंदिवस विनयभंगाच्या घटना वाढत असून त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनयभंगाच्या नऊ घटना घडल्या. त्यात शाळकरी मुलींवरही हा प्रसंग ओढवल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकाच दिवशी विनयभंगाच्या तीन घटनांची नोंद रविवारी सक्करदरा आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली. सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक सतरा वर्षीय मुलगी रविवारी दुपारी २ वाजता आपल्या राहत्या घरी एकटीच होती. दुर्गानगरातील गजानन ढोमणे (३६) हा तिच्या घरात शिरला व तिचा विनयभंग केला. दुसरी घटना याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री १० वाजता घडली. भांडे प्लॉट येथील स्वप्नील भीमराव नाईक (२१) हा एका महिलेच्या घरापुढे आरडाओरड करत होता. या महिलेने त्याला ओरडण्यास मनाई केली. यामुळे चिडलेल्या स्वप्नीलने तिला अश्लील शिवीगाळ केली तसेच तिचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर शारीरिक संबध ठेवण्याची मागणी तिच्याकडे केली. तिने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तिसरी घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविवारी दुपारी दीड वाजता एक चोवीस वर्षीय महिला एकटीच घरी होती. यावेळी आरोपी श्रीधर गोपीचंद मसराम (४५) याने घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केला. आरडाओरड केली असता आरोपीने तिला मारहाण केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
२७ सप्टेंबरला दुपारी १.४५ वाजता यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक चौदा वर्षीय मुलगी शाळेतून घरी येत होती. यावेळी आरोपी संकेत बोरीकरने (२४) तिचा विनयभंग केला. याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता शौचाला जात असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रायफल बार अॅण्ड रेस्टारेंटमध्ये गायिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. २६ सप्टेंबरला सकाळी ११.१५ वाजता एक तेरा वर्षे वयाची मुलगी शाळेत जात होती. एका २५वर्षीय तरुणाने या मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी पिंटू रमेश हातीपचेश याला अटक केली. ‘मुझसे शादी करेगी क्या’़, असे म्हणून बगडगंज येथील सर्वेशकुमार प्रजापती (४०) याने नंदनवन परिसरातील एका वीस वर्षीय महिलेचा विनयभंग केला. या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरातील १३ आणि १० वर्षीय दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. फिर्यादीने आजपर्यंत नातेवाईकांकडे शोध घेतला असता त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदवून पुढील सुरू केला आहे.
पूर्वीपेक्षा प्रमाण कमी – साखरकर
विनयभंगाची घटना घटना घडल्यानंतर व त्याची तक्रार येऊ लागल्याने गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या घटनांत वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुळात पूर्वीपेक्षा विनयभंगाच्या घटनांत घट झाली असल्याचा दावा गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त गंगाराम साखरकर यांनी लोकसत्ताशी बोलताना केला. ते म्हणाले, विनयभंग करणे ही मानवी विकृती आहे. इतर शहराच्या तुलनेत नागपूर शहरात या घटना कमी होत आहे. ज्या घटना घडतात त्याची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करून पीडित महिलेला दिलासा दिला जातो. अशा प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे मान्य करून साखरकर म्हणाले, अशा घटना होऊ नये म्हणून शहरातील एल.ए.डी. महाविद्यालय, फुटाळा तलाव, तेलंगखेडी, बसस्थानक व गर्दीच्या परिसरात गुन्हे शाखेचे पथक तैनात केले जाते. त्यामुळे अशा घटनांवर आळा बसला आहे. अशा घटना घडल्यास पीडितेने न घाबरता अथवा कुणाच्या दबावाला बळी न पडता जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही साखरकर यांनी केले आहे.