कुलूपबंद घरांवर चोरटय़ांची नजर

शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्टय़ा आणि लग्नसराईमुळे अनेक नवी मुंबईकर गावी किंवा शहराबाहेर गेले आहेत. कुलूपबंद असलेल्या घरांचे सर्वेक्षण करीत रात्रीच्या वेळी तेथे चोरटे हातसफाई करीत आहेत.

शाळांना लागलेल्या उन्हाळी सुट्टय़ा आणि लग्नसराईमुळे अनेक नवी मुंबईकर गावी किंवा शहराबाहेर गेले आहेत. कुलूपबंद असलेल्या घरांचे सर्वेक्षण करीत रात्रीच्या वेळी तेथे चोरटे हातसफाई करीत आहेत. गेल्या काही दिवसांत कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, खारघर आदी परिसरांत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे घराबाहेर पडल्यावर चोरटे घरातील मौल्यवान वस्तू हातसफाई करतील की काय, या भीतीने नवी मुंबईकर धास्तावलेले असतात.
दोन दिवसांपूर्वी वाशी सेक्टर-८ येथील गगनदीप सोसायटीमधील डॉ. प्रकाश कसबेकर यांच्या बंद घराचा लॉक तोडून चोरटय़ांनी तिजोरीसह ३० तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्यांचे दागिने, रोख रक्कम चोरून नेली होती. चोरी पकडली जाऊ नये यासाठी चोरटय़ांनी घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडली असल्याचे समोर आले. कोपरीगाव येथील सूर्यवंशी हाऊसमधील हुमेरा खान यांच्या घरातून चोरटय़ांनी ६४ हजारांची रोकड चोरून नेली आहे. सानपाडा सेक्टर-५ येथील पंचवटी अपार्टमेंटमधील नरवडे आणि इम्तियाज कुरेशी यांच्या घरातील दागिने आणि रोकड असा १ लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. करावे गावातील गणेश तांडेल यांच्या घरातील दीड लाखांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला आहे.
काही दिवसांपूर्वी कामोठय़ात पोलीस अधिकारी राहात असलेल्या इमारतीतील पनवेलचे माजी पोलीस उपायुक्तांच्या नातेवाईकाच्या घरातच हातसफाई केली होती. दररोज पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत किमान तीन घरफोडीचे गुन्हे नोंदविले जात आहेत. घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत.
घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून रात्रग्रस्त, नाकाबंदी आदी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र तरी घरफोडीचे प्रमाण कमी झालेले नाही. घरफोडी झालेल्या घरामध्ये एक बाब आढळून येते की, सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेले लॉक, कडी-कोंयडा हे हलक्या प्रतीचे असतात. यामुळे ते तोडणे चोरटय़ांना सहज शक्य आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increase in robbery

ताज्या बातम्या