विदर्भासह राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी.. शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात झालेले नुकसान आणि महागाईने वर काढलेले तोंड.. अशा कचाटय़ात सापडलेल्या सामान्यांना यंदाचा श्रावण महिना फारसा आनंदाचा न जाण्याचीच चिन्हे आहेत. अतिवृष्टीमुळे मोठे संकट कोसळलेले असताना विदर्भही त्याला अपवाद राहिलेला नाही. गेल्या काही दिवसात आवक कमी झाल्यामुळे बहुतेक सर्व भाज्यांचे भाव दुपटीने वाढले असून अशीच परिस्थिती राहिली तर भाज्यांचे भाव यंदाच्या श्रावणमासात गगनाला भिडण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या एक महिन्यापासून विदर्भासह राज्यातील विविध भागात पाऊस होत असल्यामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. लावण्यात आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत.  बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी झाली. भाज्यांच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना फायदा होत असला तरी सामान्य नागरिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. ७ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून या सणासुदीच्या दिवसात भाज्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता भाजी विक्रेत्यांनी वर्तविली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवडय़ापासून विदर्भात पावसाने जोर धरल्यामुळे फळ व पालेभाज्यांची आवक घटली आहे. एरव्ही पावसाळ्यात भाजीपाला महाग होतो, मात्र यंदा अतिवृष्टीमुळे काही भाज्यांनी तर कळसच गाठला आहे. जेवणाचा आस्वाद वाढविणारी कोथिंबीर ८० रुपये, आले  १६०, लसूण ८० रुपये किलो प्रमाणे विक्रीला असून भाज्या ६० ते ८० रुपये किलो भावाने विक्रीला आहेत. मेथीसुद्धा १०० रुपये किलोप्रमाणे विक्रीला आहे. महागाईमुळे अनेकांच्या घरातील बजेट कोलमडले आहे. जिल्ह्य़ातील आसपासच्या गावातून भाजीपाला नागपुरात येतो. आंध्रप्रदेश, नाशिक आणि विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांतूनही मोठय़ा प्रमाणात भाजीपाला येत असतो. टोमॅटो, फूल कोबी, कोथिंबीर, मेथी, मिरची या रोजच्या जेवणात हमखास आढळणाऱ्या भाज्यांचे भाव अधिकच वाढले आहे. परिणामी गृहिणींपुढे भाज्यांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. श्रावण महिन्यात अशीच परिस्थिती राहिली तर सणासुदीच्या दिवसात मोठी अडचण निर्माण होणार आहे. साधारणत: श्रावणात शाकाहार वाढतो. साहजिकच या महिन्यात भाज्यांची मागणी मोठी असते. आवक आणि मागणी या प्रमाणामुळे भाज्यांचे दरही वाढलेले असतात. भेंडी, दुधी भोपळा, फ्लॉवर, सीमला मिरची, पालक, गाजर, पोपट आणि कोबी यांच्या दरातही १५ ते २० टक्के वाढ झाली असल्याचे कॉटेन मार्केटमधील भाजी विक्रेता संघाचे सदस्य राजाभाऊ पत्राळे यांनी कबूल केले. काही भाज्यांच्या दरात वाढ झाली असली तरी आवक कमी झालेली नाही. मात्र पावसाने अशाच प्रकारे दांडी मारली तर मात्र नंतर काही खरे नाही, असे पत्राळे यांनी सांगितले. विदर्भ परिसरातील काही जिल्ह्य़ांमध्ये भाज्यांचे भाव अजून आवाक्यात आहेत, पण ही दरवाढ आणखी होण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही. कळमना मार्केटमध्ये माथाडी कामगार संपावर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी माल उचलणे बंद केले आहे. २० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या कांद्याची ६० रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे. या दरवाढीचा फटका ग्राहकांसोबतच लहान हॉटेलचालक, भेळविक्रेते व भोजनालयांनाही बसत आहे. दैनंदिन व जीवनावश्यक गोष्टीचे दर विविध कारणाने गगनाला भिडत आहेत. अजून काही दिवस असाच पाऊस आला तर भाज्यांचे दर चढेच राहतील, अशी प्रतिक्रिया कॉटेन मार्केटमधील बाजारातील भाजी विक्रेत्यांनी
व्यक्त केली.

किरकोळ बाजारात टोमॅटो ६० रुपये किलो, पालक ६०, भेंडी ६०, चवळी ५० ते ६०, सीमला मिरची ६० ते ८०, कारले ६० रुपये, काकडी ३०, ढेमस  ५०, गाजर ४०, तोंडले ४०, कोहळे ३०, मेथी १०० ते १२५, आले १६०, लसूण ८० ते १००, मुळा ३० ते ४०, चळवळीच्या शेगा ६०, पत्ताकोबी ४०, तुरई ५०, भेंडी ६०, परवळ ५०,ते ६०, वांगे ६०, तोंडले ४०, मुळा ४०, बीट ६० तुरई ६० रुपये किलो, लवकी ४०, दुधीभोपळा ४०, लिंबू १ रुपया.