दिल्ली आणि मुंबईतील सामूहिक बलात्काराच्या घटनांनंतर संतापाचा उद्रेक झाला, गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यासाठी कायद्यात कठोर सुधारणाही करण्यात आल्या, तरीही बलात्काराच्या गुन्ह्य़ांमध्ये मात्र तसूभरही घट झालेली नाही. उलट, गेल्या एका वर्षांत सामूहिक बलात्काराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तीन वर्षांच्या बालिकेपासून ५५ वर्षांच्या महिलेपर्यंत अनेकांना या विकृतीची शिकार व्हावे लागले आहे. शांघायसारखा कायापालट होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मुंबईतच घडलेल्या या घटनांमुळे, पोलीस यंत्रणांपुढील आव्हानही अधिक तीव्र झाले आहे.
जानेवारी २००९ ते मे २०१४ या कालावधीत एकटय़ा मुंबईत सामूहिक बलात्काराचे ५९ गुन्हे मुंबई पोलिसांकडे नोंदविले गेले. त्यातील सर्वाधिक, म्हणजे १८ गुन्हे एकटय़ा २०१३ या वर्षांत घडले आहेत. जानेवारी २०१४ ते मे २०१४ या पाच महिन्यांमध्ये असे सात गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरात नोंद आहे. विशेष म्हणजे, सामूहिक बलात्काराच्या भीषण घटना उजेडात आल्यानंतर अशा गुन्ह्य़ांच्या संख्येत आणखीनच वाढ झाल्याचे या नोंदीवरून दिसते. सन २०१२ मध्ये मुंबईत सामूहिक बलात्काराच्या आठ घटना घडल्या होत्या. २०१३ मध्ये या गुन्ह्य़ांमध्ये शंभर टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या वर्षांत १८ गुन्हे नोंदविले गेले आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये हे गुन्हे अधिक प्रमाणात घडल्याचे पोलीस दप्तरावरून दिसते. २०१० मध्ये साकी नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्कार झाल्याची नोंद आहे, तर पंतनगर परिसरात जानेवारी ते मे २०१४ दरम्यान ५५ वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची नोंद पंतनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे.
सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्य़ांची ही आकडेवारी परिपूर्ण नाही. ही केवळ पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या संगणक कक्षाकडे उपलब्ध असलेली माहिती आहे. सामाजिक कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या या माहितीमुळे, मुंबईतील विकृत गुन्ह्य़ांचा एक भीषण चेहरा उघड झाला आहे. कारण, सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्य़ांची शिकार झालेल्या ५९ पैकी निम्म्याहून अधिक म्हणजे, ३१ मुली अल्पवयीन आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 12th Aug 2014 रोजी प्रकाशित
विकृती थांबता थांबेना!
दिल्ली आणि मुंबईतील सामूहिक बलात्काराच्या घटनांनंतर संतापाचा उद्रेक झाला, गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यासाठी कायद्यात कठोर सुधारणाही करण्यात आल्या, तरीही बलात्काराच्या गुन्ह्य़ांमध्ये
First published on: 12-08-2014 at 06:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing cases of women violence