* पाण्याअभावी ५० हजार हेक्टर क्षेत्र नापेर
* सूर्यफूल व भुईमुगाचा पेरा घटला
राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाचा उन्हाळी पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम होत आहे. यावर्षी दुष्काळी स्थितीचा मोठा फटका उन्हाळी पिकांनाही बसला आहे. पाण्याअभावी राज्यातील जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी झाली नाही. सूर्यफूल व भुईमुगाच्या पेऱ्यात यावर्षी मोठी घट झाली आहे. दुष्काळीस्थितीची फारसी झळ नागपूर विभागाला मात्र बसलेली नाही. या विभागात उन्हाळी हंगामातील पिकाखालील क्षेत्र ३६ टक्क्याने वाढले आहे.
 यावर्षीच्या उन्हाळी पिकांच्या हंगामात राज्यात ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली, पण पाण्याअभावी ५० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होऊ शकली नाही. बुलढाणा, अकोला व नागपूर जिल्ह्य़ांत उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी झाली नाही. राज्यात ८०० हेक्टरमध्ये म्हणजे  केवळ दहा टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थेत पोहोचले आहे.
राज्यात उन्हाळी भात पिकाची २९ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात, मका १२ हजार हेक्टर, भुईमुगाची ४ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्य़ांसह राज्यातील १७ जिल्ह्य़ांमध्ये उन्हाळी मका पीक घेण्यात येते. या हंगामात १२ हजार हेक्टरवर उन्हाळी मक्याची पेरणी झाला आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन गुरांना चारा मिळावा म्हणून कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्याने बऱ्यापैकी मक्याच्या पेरणी झाली. १९०० हेक्टरवर उन्हाळी बाजरीची पेरणी झाली आहे.
वाढत्या तापमानाची झळ उन्हाळी पिकांना बसली आहे. विदर्भातील तापमान गेल्या आठवडाभरापासून वाढत असून नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्य़ांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. एवढय़ा तापमानात तग धरणे पिकांनाही कठीण झाले आहे. वाढत्या तापमानाचा पिकांच्या उत्पादनावर निश्चित परिणाम होणार आहे. नागपूर विभागात उन्हाळी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २० हजार ४०० हेक्टर असताना यावर्षी २७ हजार ८०० हेक्टरमध्ये पिकांची लागवड करण्यात आली आहे. विभागात शेतक ऱ्यांनी यंदा प्रामुख्याने उन्हाळी भात व भुईमुग या दोन पिकांचीच लागवड केली आहे. उन्हाळी सूर्यफुलाच्या लागवडीकडे शेतक ऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरविली आहे. उन्हाळी सोयाबीन, मुग व मका या पिकांची विभागात लागवड झालेली नाही. खरीप व रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात पिके घेण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध नाही.