जाड पाकळ्यांचे, कळीदार गुलाब ही युरोपची ओळख. तर दरवळणारा सुगंध ही खास भारतीय गुलाबांची मक्तेदारी. भारतीय वातावरणात सहजरित्या वाढू शकतील, असे सुगंधी, विविधरंगी गुलाब गेल्या काही वर्षांत विकसित करण्यात आले आहेत. भारतीय गुलाबप्रेमींची ही निर्मिती मुंबईकरांना पाहता यावी यासाठी ‘मुंबई रोझ सोसायटी’ने आयोजित केलेल्या यावर्षीच्या गुलाब प्रदर्शनात खास भारतीय गुलाबांसाठी वेगळा कक्ष देण्यात आला आहे.
जगभरात गुलाबाच्या सात हजाराहून अधिक प्रकारांची नोंद झाली आहे. प्रत्येक गुलाबाचे स्वत:चे वैशिष्टय़ असते. एखाद्या गुलाबाच्या पाकळ्यांचा आकार वैशिष्टय़पूर्ण असतो, एखाद्याचा रंग चित्ताकर्षक असतो तर प्रफुल्लित करणाऱ्या सुगंधाने एखादे फुल परिचित होते. अशा वेगवेगळ्या वैशिष्टय़ांच्या दोन किंवा अधिक जातींचा संकर करून नवीन गुलाबही तयार केला जातो. असे गुलाब विकसित करणे अर्थातच सोपे नसते. योग्य ते वैशिष्टय़ पुढच्या पिढीत संक्रमित झाले आहे का ते पाहण्यासाठी या गुलाबांना विविध चाचण्यांमधून जावे लागते आणि त्यानंतर भारतीय कृषी संशोधन विभागात त्याची नोंद होते.
या गुलाबाचे वैशिष्टय़ तसेच इतरांपेक्षा निराळेपण जपून ठेवण्यासाठी त्याचे डीएनए िफगरिपट्रिंगही केले जाते. अशा प्रकारे खास भारतीय मातीत तयार केलेल्या व उष्ण हवामानात फोफावणाऱ्या पाचशेहून अधिक गुलाबांचे प्रकार नोंदवण्यात आले आहेत. यातील पन्नासहून अधिक प्रकार या गुलाब पुष्प प्रदर्शनात पाहता येतील.यासोबतच पुणे, नाशिकसह नागपूर, इंदोर, कोलकाता येथूनही नवनवीन गुलाबाचे प्रकार मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत. वांद्रे-सायन रस्त्यावर, धारावी बस डेपोसमोरील, महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे १ व २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले राहील, अशी माहिती मुंबई रोझ सोसायटीचे सदस्य अविनाश कुबल यांनी दिली.