परभणी महापालिका क्षेत्रात घटसर्प (डिफ्थेरिया) विकाराची ४ संशयित बालके आढळून आली. या बालकांना पुढील उपचारांसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजले. दरम्यान, याच कुटुंबातील अडीच वर्षांच्या मुलीचा रविवारी मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू घटसर्पाने झाला नसून तिला न्यूमोनियाची लागण झाली होती, असे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकाराची आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी गंभीर दखल घेतली.
शहराच्या क्रांतिनगर भागात घटसर्प (डिफ्थेरिया) या आजाराची ४ संशयित बालके आढळून आली. या बालकांना अधिक उपचारांसाठी औरंगाबादला घाटी रुग्णालयात हलविले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकारानंतर या भागात ३९५ घरात आरोग्य विभागातर्फे लगेच लसीकरणाबाबत सर्वेक्षण करण्यात आले. शून्य ते पाच वर्षांखालील २६२ पकी सुमारे १५० मुले लसीकरणापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेने लसीकरणाबाबत आवश्यक ती खबरदारी घेऊन शहरी भागात लसीकरणाची मोहीम गतिमान करावी, असे आदेश राज्यमंत्री खान यांनी दिले. मनपा क्षेत्रात लसीकरणाचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे खान यांनी स्पष्ट केले. सर्वच पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांचे लसीकरण करून घेत त्यांचे संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय रुग्णालयाच्या वतीने पाच वर्षांपर्यंत लसीकरण न झालेल्या मुलांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. जवळपास ५५ हजार बालकांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी कुलकर्णी यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Sep 2013 रोजी प्रकाशित
घटसर्पाची लागण झालेली परभणीत ४ संशयीत बालके
परभणी महापालिका क्षेत्रात घटसर्प (डिफ्थेरिया) विकाराची ४ संशयित बालके आढळून आली. या बालकांना पुढील उपचारांसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वाची प्रकृती स्थिर असल्याचे समजले.
First published on: 20-09-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infection of diphtheria in parbhani