बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिकेला मान्य आहे. त्यासाठी एकजण तब्बल ३१ वेळा पालिका अधिकाऱ्यांना भेटतो. वर्षभर पाठपुरावा करतो. अगदी महापौरांपर्यंत जातो. पण हे सोसायटीचे पदाधिकारी आणि पालिका अभियंते यांच्या कथित युतीमुळे या बांधकामावर हातोडा काही चालत नाही. ही कहाणी आहे गोरेगाव (पूर्व) येथील पांडुरंगवाडीतल्या सिंदूर सोसायटीतील अनधिकृत बांधकामाची.
संस्थेच्या समितीची अथवा पालिकेची परवानगी न घेता जिन्याखालील खुल्या सामाईक जागेत पक्के बांधकाम करण्यात आले आहे. ४ बाय ७ फुटांचे हे बांधकाम आहे. या बांधकामाविरुद्ध सोसायटीतील रहिवासी अतुल तावडे यांनी अंधेरी पश्चिमेच्या महापालिकेच्या कार्यालयात तक्रार केली होती. त्यावर संबंधित इमारतीचा मूळ मंजूर आराखडा आणि भोगवटा प्रमाणपत्र सादर करा, असे पत्र संबंधित अधिकाऱ्याने तावडे यांनाच पाठविले. बऱ्याच पत्रव्यवहारानंतर आणि प्रत्यक्ष भेटींनंतर पालिकेच्या सहाय्यक अभियंत्यांनी अनधिकृत बांधकामाची पाहणी केली. पण तरीही या अनधिकृत बांधकामावर आजतागायत कारवाई झालेली नाही, असे तावडे यांनी सांगितले.
सतत पाठपुरावा केल्यानंतरही पालिका अधिकारी ताकास तूर लागू देत नव्हते. त्यामुळे अखेर माहितीच्या अधिकाराचा आधार घेत त्यांनी माहिती मिळविली. या बांधकामास पालिकेची परवानगी नसल्याचे उघड झाले. त्यानंतर तावडे यांनी पी-दक्षिण विभागातील सहाय्यक अभियंत्यांना अनेक स्मरणपत्रे पाठविली, इमारत व कारखाने विभागाच्या अभियंत्यांची तीन वेळा तर अन्य एका अधिकाऱ्याची २८ वेळा भेट घेतली. परंतु आजतागायत या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यात आलेला नाही. यावरून पालिका अधिकाऱ्यांचाच या अनधिकृत बांधकामास आशीर्वाद असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप अतुल तावडे यांनी केला आहे. त्यांनी आजवर अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (निष्कासन व अतिक्रमण), सहाय्यक आयुक्त (निष्कासन व अतिक्रमण) पश्चिम उपनगरे आदी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
‘लोकसत्ता’च्या ‘लाऊड स्पीकर’ उपक्रमात महापौर सुनील प्रभू सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमाचे वृत वाचून तावडे यांनी आशेने त्यांच्या गोरेगावातील कार्यालयातही आपली तक्रार दिली. महापौर या अनधिकृत बांधकाम प्रकरणात लक्ष घालतील, अशी आशा त्यांना आहे. मात्र अद्याप तरी ती फलद्रुप झालेली नाही.