रिझव्र्ह बँक सहकारी बँकांना घालत असलेल्या अटी या जाचक स्वरूपाच्या आहेत, असे न समजता त्यामागे बँकांनी सक्षम व्हावे, असा दृष्टिकोन आहे, याची बँकांनी जाणीव ठेवली पाहिजे. सहकारी बँकांना अडचणीच्या वाटणाऱ्या कॅमल रेटिंग व सुपरव्हायझरी अॅक्शन फ्रेम वर्क या बाबतीमधील निकषामध्ये रिझव्र्ह बँक आवश्यक त्या सुधारणा निश्चितपणे करीत आहे, असा स्पष्ट निर्वाळा भारतीय रिझव्र्ह बँकेचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर एस. करूप्पा सामी यांनी बुधवारी इचलकरंजी येथे बोलताना दिला.
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्यावतीने श्रीमंत घोरपडे नाटय़गृहात पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नागरी सहकारी बँकांसाठी चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. करूप्पा सामी यांच्याहस्ते नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या रूपे एटीएम कार्डचे अनावरण व बँक ग्राहकांना वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आवाडे जनता बँकेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
सहकारी बँकांनी २ लाख ३५ हजार कोटी रूपयेपर्यंत ठेवी जमविण्यात जशे यश मिळविले आहे, तसेच समाज सुधारणेच्या कामातही या बँकांनी लक्षणीय प्रगती केली आहे, असा उल्लेख करून करूप्पा सामी म्हणाले, सामाजिक भान ठेवून काम करणाऱ्या सहकारी बँकांसाठी रिझव्र्ह बँक ही तत्त्वव्यस्था व मार्गदर्शक म्हणून काम करीत राहिल. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून रिझव्र्ह बँकेने सहकारी बँकांच्य कामकाजासाठी सुधारणा केल्या आहेत. त्यामध्ये शाखांमध्ये वाढ करणे व हेडरूम कॅपिटल यांचा उल्लेख करावा लागेल.चर्चासत्रावेळी बँकींग अभ्यासकांनी रिझव्र्ह बँकेची परिपत्रके सहकारी बँकांसाठी त्रासदायक ठरत असल्याने त्यामध्ये सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. हा संदर्भ घेवून बोलतांना करूप्पा सामी म्हणाले,एकूणच सर्व बँकांसाठी रिझव्र्ह बँक परिपत्रक वितरीत करीत असते. यामध्ये बँकांनी सक्षम व्हावे, हा उद्देश आहे. सुपरव्हायझरी अॅक्शन फ्रेम वर्कबाबत लागू केलेले निकष हे अर्बन बँकांच्या सुधारणांसाठी आणि त्यांची ताकद ओळखण्यासाठी केले आहेत. त्यामुळे भांडवल पर्याप्तता प्रमाण, अनुत्पादक कर्जाचे प्रमाण व मोठय़ा रकमेच्या ठेवी यामध्ये सुधारणा होणार आहेत. रिझव्र्ह बँकेने कॅमल रेटिंग पध्दतीमध्ये सुधारणा केली असून वजा व अधिक प्रमाण काढून टाकले आहेत. यापुढे ए, बी, सी व डी रेटिंग बँकांना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय नागरी सहकारी बँक महासंघाचे अध्यक्ष एच.के.पाटील यांनी सहकारी बँकांना भेडसावणाऱ्या समस्यांची चर्चा करून याकडे रिझव्र्ह बँकेने डोळे उघडे ठेवून पहावे, अशी मागणी केली. सहकारी बँका या नफा मिळविण्यासाठी नसून त्या सामाजिक भान ठेवून विकासासाठी कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.त्यामुळे रिझव्र्ह बँकेने सहकारी बँकांना नफ्यातील १० टक्के रक्कम भाग विकासासाठी देण्यास परवानगी देण्याची मागणी केली. बेसल तीन या रिझव्र्ह बँकेने लागू करणाऱ्या प्रणालीमध्ये येणाऱ्या अडचणींची चर्चाही त्यांनी केली.
या वेळी महाराष्ट्र अर्बन बँक महासंघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी महाराष्ट्र सहकारी कायदादुरूस्ती या विषयावर मत मांडले. कोल्हापूर जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष श्यामराव शिंदे यांनी नागरी सहकारी बँकांसमोरील समस्यांची चर्चा केली. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सहकारी बँकांना स्वयंरोजगार,पंतप्रधान कर्ज योजना रूढ सेट या सारख्या कर्ज योजना राबविण्यासाठी नाबार्ड व सीडबीने मदत करावी,अशी मागणी केली. आवाडे जनता बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँकेचे महाव्यवस्थापक पी.टी.कुंभार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. नॅफकबचे अधिकारी सुभाष गुप्ता यांनी आभार मानले.