परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना किंवा आप्तेष्टांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेण्यासाठी मोठय़ा उत्साहाने गाडी घेऊन विमानाच्या वेळेला पोहोचल्यावर गाडी थांबवायची कुठे, हा मोठा प्रश्न असतो. विमानतळाच्या बाहेर गाडी थांबवावी, तर वाहतूक पोलीस शिट्टय़ा मारून बाहेर काढतात. विमानतळावर न्यावी, तर अगदी पाच मिनिटे थांबण्यासाठीही ११० रुपये भरावे लागतात. गाडी न घेता रिक्षा किंवा टॅक्सीने जावे म्हटले तर या रिक्षा-टॅक्सी चालकांकडून घेण्यात येणाऱ्या ५० रुपये विमानतळ शुल्काचा बोजा आपल्याच खिशावर पडतो. पुन्हा, या रिक्षा-टॅक्सी चालकांना थांबण्याची मुभा नसल्याने सामानासकट परत येताना ‘प्रीमियम’ किंवा ‘गोल्ड’ सेवा असलेली टॅक्सी किलोमीटरमागे तीन ते चार रुपये जादा भरून घ्यावी लागते. परिणामी, विमानतळावर आप्तेष्टांचे स्वागत किंवा त्यांना निरोप देणे महागात पडत आहे.
जुन्या टर्मिनल-२ वर जाणाऱ्यांनाही याआधी असाच भरुदड पडत होता. त्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन करून विमानतळावर जाण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून घेण्यात येणारे ५० रुपये विमानतळ शुल्क बंद करण्यास भाग पाडले होते. काही दिवस हे शुल्क घेतले जात नव्हते. मात्र नव्या टर्मिनल-२च्या उद्घाटनाबरोबरच हे शुल्क पुन्हा वसूल करण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. याबाबत रिक्षा-टॅक्सी चालक आणि प्रवाशांमध्येही सातत्याने वाद होत असतात.
नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलवर स्वत:ची गाडी घेऊन येणाऱ्यांना पार्किंग शुल्कापोटी अध्र्या तासाचे ११० रुपये भरावे लागत आहेत. दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई या कोणत्याही शहरांपेक्षा हे शुल्क खूपच जास्त आहे. विशेष म्हणजे नव्या आंतरराष्ट्रीय टर्मिनलची बांधणी करताना येणाऱ्या गाडय़ा थेट वाहनतळात शिरतील, अशा प्रकारे ते उभारले आहे. त्यामुळे या वाहनतळावर गाडी उभी करूनच मग निरोप देण्यासाठी आगमन किंवा निर्गमन कक्षाकडे जाता येते. विमानतळावर येणाऱ्या गाडय़ा क्वचितच १०-१५ मिनिटांच्या वर तेथे थांबतात. विमान उशिराने येणार असेल, तरच विमानतळावर थांबावे लागते. मात्र विमानतळ प्राधिकरणाने सर्वच गाडय़ांना सरसकट अध्र्या तासासाठी ११० रुपये शुल्क लावले आहे.
याबाबतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विमानतळ प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करून काही मिनिटांसाठी ११० रुपये आकारणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यावर प्राधिकरणाने अद्याप तरी काहीच उपाययोजना केलेली नाही. विशेष म्हणजे, फोनवरून आरक्षण केल्यास फ्लिट टॅक्सीही आरक्षण स्वीकारण्यास नकार देतात. त्याऐवजी ते विमानतळावरील आपल्या काऊंटरवरच आरक्षण करण्याचा सल्ला देतात. मात्र येथे साध्या फ्लिट टॅक्सीऐवजी प्रीमियम किंवा गोल्ड या प्रति किमीमागे तीन ते चार रुपये जादा दर आकारणाऱ्या टॅक्सीचा भरणाच जास्त आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक भरुदड पडत आहे.
विमानतळावरील पार्किंगचे दर
पार्किंगचा कालावधी दर
१-३० मिनिटे ११० रुपये
अर्धा ते दोन तास १८० रुपये
दोन ते तीन तास २६० रुपये
तीन ते चार तास ३४० रुपये
आठ तासांपेक्षा जास्त ११०० रुपये
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2014 रोजी प्रकाशित
आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंगचे इंटरनॅशनल दर
परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना किंवा आप्तेष्टांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेण्यासाठी मोठय़ा उत्साहाने गाडी घेऊन विमानाच्या वेळेला पोहोचल्यावर गाडी

First published on: 04-03-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International rate on international airport parking