बांधकाम क्षेत्रात रममाण झालेल्या एका निराश विद्यार्थ्यांला मिलिंद पाटील नावाच्या मित्राने जगण्याचा आणि शिक्षणाचा अर्थ समजावून सांगितला. त्याला असे काही मार्गदर्शन केले की तो इतरांच्या बंगल्याच्या साईटवर काम करण्याचे सोडून स्वत:च्या स्वप्नांचे इमले बांधण्यात आणि सिमेंट वाळूऐवजी पुस्तकांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या मटेरिअलमध्ये पार बुडून गेला. पुढे जाऊन गुणवंत शिक्षक झाला. हे सारे प्रत्यक्षात साकारले ते मिलिंद पाटील यांच्या अफाट विद्वत्तेच्या बळावर. तसेच ‘शहाणे करून सोडावे सकलजन’ या वृत्तीने. असे एक नाही अनेक प्रसंग या पाटलांच्या शिक्षण क्षेत्रातील लक्षवेधी ‘पाटीलकी’ ची साक्ष देऊन जातात. एका वसतीगृहात राहणाऱ्या कला शिक्षकाला मिलिंद यांनी इंग्रजी शिकविण्याचा ध्यास घेतला. त्याच्यापाठी सावलीसारखं उभे राहून त्यांच्यात इंग्रजी शिक्षणाची उमेद पेरली. आज तो कलाशिक्षक त्याच्या गुणवत्तेने थेट अमेरिकेची सफर करून आला आहे. मिलिंद पाटील हेच माझे माय-बाप आणि शिक्षक हे तो आज सर्वाना अभिमानाने सांगत आहे. कुठे बीएड्चा अभ्यास अवघड म्हणून थेट महाविद्यालयातून घरी पळून आलेल्या मित्राचा सारखा पिच्छा पुरवत ‘रडण्यापेक्षा लढण्याचा’ मंत्र देऊन त्याला परीक्षेला बसण्यास भाग पाड तर, कुठे इंग्रजी विषय कसा शिकवला पाहिजे, परिपाठ कसा असावा, हे आपल्या शिक्षक मित्रांना सांगण्यासाठी अगदी तासनतास, रात्रीचा दिवस करून त्यांची इच्छा असो वा नसो मार्गदर्शनाचा ‘एक्स्ट्रा पिरीअेड’ घे, हे सारं अवघ्या छत्तीस वर्षांचा तरुण अत्यंत कुशलतेने, मोठय़ा धडपडीतून करत असेल आणि कसं सारं जमवून आणत असेल, हे कळणे अवघडच.
आज मिलिंद यांची सर्वाना प्रकर्षांने आठवण येत आहे. त्यांच्या ज्ञानामृताचा प्रत्येक थेंब आपल्या वाटय़ाला कसा आला यावर त्यांचे मित्र, सहकारी, विद्यार्थी अगदी गहिवरल्या स्वरात सांगत आहेत. त्यांचे मोठेपण जणू संपूर्ण जगाला ओरडून सांगावे, त्याच्यातील तत्वज्ञ, मार्गदर्शक, आपुलकीचा सडा शिंपणारा आधारवड यांची प्रत्येकाला ओळख व्हावी याकरिता सारे जण आसूसलेले आहेत. पण त्या साऱ्यांना बोलण्यासाटी शब्दच फुटत नाहीत. साऱ्यांचेच डोळे भरून आले आहेत. आपल्या या दोस्ताला आठवताना त्यांच्या काळजात कालवाकालव होत आहे. अनेकांना जीवनाची ‘दिशा’ देणारा आपल्या प्रतिभेच्या नंदादीपाने अनेकांचे आयुष्य उजळून टाकणारा मिलिंद पाटील नावाचा ‘दीपस्तंभ’ आज या जगात नाही. गेल्या आठवडय़ात पंचवटीत झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि शिक्षणासाठी झपाटलेल्या महत्वाकांक्षी तरुणाच्या आयुष्याचा डाव अध्र्यावरच संपला. मिलिंदच्या अकाली निधनाने सारे सैरभैर झाले आहेत. ते आपल्यात नाही ही कल्पनाच त्यांच्यासाठी विश्वास ठेवण्यापलीकडची. जीवलग मुकेश मिसरसह के. आर. टी. विद्यालय, होरायझनमधील त्याच्या सहाकाऱ्यांच्या, मित्रांच्या मनात मिलिंदच्या आठवणींनी, त्यांच्या शिक्षणासाठी झोकून देण्याच्या स्वभावाने घर केले आहे.
प्रारंभी त्यांनी स्वत:हून अपयश ओढून घेतले खरे पण, नंतर मात्र हुषारी व चिकाटीने ते ‘अभ्यासू’ लोकांच्या रांगेत जाऊन बसले. बीए आणि एमए परीक्षेत पुणे विद्यापीठाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावले. बीएड्, सेट, नेट मधील त्यांचे यशही स्पृहणीय ठरले. नाशिकच्या ‘अशोका’ मध्ये पाच वर्षे त्यांनी समन्वयक म्हणून काम केले. झाशीच्या मान्यताप्राप्त राणी लक्ष्मीबाई शाळेत त्यांनी वर्षभर नोकरी केली. जागतिक दर्जाच्या ‘मेओ’ शाळेत त्यांची निवड झाली होती. हा त्यांच्या विद्वत्तेचा सन्मानच म्हणावा लागेल. मानूर येथील शरद पवार पब्लिक स्कुलमध्येही त्यांनी काही काळ नोकरी केली. मिलिंद पाटील सध्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या होरायझन विद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांचे वेगळेपण असे की अल्प वयात इंग्रजीचा ‘गाढा अभ्यासक’ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. इंग्रजी कसे वाचावे, कसे बोलावे, कसे लिहावे तसेच इंग्रजीचे अध्यापन कसे करावे हे भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगणारं मिलिंद पाटील नावाचे एक स्वतंत्र विद्यापीठच जणू आकार घेत होतं. इंग्रजी साहित्याचे अफाट भांडार ही त्यांची खरी ‘इस्टेट’, घरात इंग्रजी कलाकृतीचे समृद्ध दालन ही त्यांची संपन्न गुंतवणूक. भारतीय इंग्रजी साहित्याबरोबरच ब्रिटीश, अमेरिकन, कॅनेडियन इंग्रजी साहित्याची त्यांनी केवळ पारायणेच केलीत असे नव्हे तर, हे सारे जागतिक इंग्रजी साहित्य त्यांनी लाखो रुपये खर्चून घरी आणले. या सर्व श्रीमंतीला त्यांनी ‘फिनिक्स’ हे नाव दिले. स्वत:पुरता हे ज्ञान मर्यादित न ठेवता ते सर्वाना भरभरून देत राहिले. नि:स्वार्थ भावनेने शिकवित राहिले. त्यातून स्वत: घडत गेले. इतरांनाही घडवित गेले. अनेक इंग्रजी अध्यापकांना त्यांनी अध्यापनाचे तंत्र प्रात्यक्षिकांसह सांगितले. सेट, नेट करणाऱ्या अनेकांना मार्गदर्शन केले. ‘कन्टेन कम मेथेडॉलॉजी ऑफ इंग्रजी’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक महाराष्ट्रातील चार प्रमुख विद्यापीठांसाठी ‘संदर्भ ग्रंथ’ म्हणून स्वीकारण्यात आले. प्रसिद्धीपासून दूर असलेल्या या आधुनिक शिक्षण महर्षीने आपल्या एखाद्या यशाची बातमीही कधी, कुठे दिली नाही. त्यांनी भारताील सीबीएसई व आयसीएसी बोर्डाच्या तब्बल पंचवीस हजार शाळांची माहिती संकलीत करून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे देशातील संपूर्ण शिक्षण विभूतींची दाद मिळवली. ‘करिक्युलम ऑफ बोनान्झा’ हा त्यांचा सेमिनार विविध राज्यातील शाळांनाही नवी दृष्टी व प्रेरणा देणारा ठरत असे. कधी कधी भारतातील शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींमुळे ते अस्वस्थ होत. इंटरनेटच्या माध्यमातून विविध जागतिक शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून आपल्या देशातील शिक्षणातील दोष ते स्पष्टपणे सांगत असत. जर्मनीत २०२२ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेचे नियोजनही तयार आहे आणि आपण मात्र वर्तमानातच अडकलो आहोत हे ते अस्वस्थपणे निदर्शनास आणून देत. मनमाडच्या केआरटी विद्यालयाच्या जडणघडणीत मिलिंदचे अमूल्य योगदान असल्याचे प्राचार्य व त्यांचा शिक्षकवृंद सांगतात.
‘वाढदिवसाला केक कापण्यापेक्षा, मेणबत्या विझवण्यापेक्षा ज्ञानाचा दिवा लावा’ असे मिलिंद सांगत. आपल्या वाढदिवसाला ठरवून ते ज्ञानसत्राचे आयोजन करीत असत. मिलिंद पाटील यांचे हे कार्य आजच्या या स्वार्थी, व्यावहारिक जगात उठून दिसणारे आहे. दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहे. आज मिलिंद नाही. एका अभ्यासू व आयुष्यभर ‘विद्यार्थी’ राहिलेल्या ज्ञानोपसकाला काळाने आपल्यातून दूर ओढत नेले. आता उरल्या फक्त आठवणी..!