पिंजऱ्याचे गज वाकवून धूम ठोकलेल्या बिबटय़ाने वन विभागाची भरदुपारी पाचावर धारण बसविली. रात्री उशिरापर्यंत या बिबटय़ाला पुन्हा जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी कसून प्रयत्न करीत होते. मात्र, दाट झाडीत लपलेला बिबटय़ा सापडत नव्हता. दरम्यान, पिंजऱ्यातून बिबटय़ा निसटून पळाल्याच्या वृत्तामुळे शहरभर चर्चाना उधाण आले होते.
गेल्या ३-४ महिन्यांपासून गंगापूर तालुक्यातील जामगाव परिसरात चांगलीच दहशत निर्माण करणाऱ्या बिबटय़ाला वन विभागाने मोठय़ा मुश्किलीने पिंजरा लावून पकडले होते. मंगळवारी या बिबटय़ाला पिंजऱ्यातून शहरात आणले होते. मात्र, बुधवारी बिबटय़ा पिंजऱ्याचे गज वाकवून पळाल्याने वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी सर्द झाले. या सर्वाचीच पाचावर धारण बसली. बिबटय़ाला पुन्हा पकडण्यासाठी आवश्यक साहित्यही नसल्याने कर्मचाऱ्यांची वेगळीच धांदल सुरू होती. उशिरा रात्रीपर्यंत बिबटय़ाला पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले नाही. अग्निशामक दलातील जवानांना बिबटय़ा पकडण्यासाठी बोलाविण्यात आले.
जामगावात पिंजऱ्यात पकडलेल्या या बिबटय़ाला शहरातील वन विभागाच्या कार्यालयात ठेवले होते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास या बिबटय़ाने पिंजऱ्याचे गज वाकविले व त्याच्या फटीतून त्याने धूम ठोकली. पिंजरे गंजलेले असल्यामुळेच त्याला पळून जाणे सुकर झाले. त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी सरसावले. पण त्यांच्याकडे साहित्यच नव्हते. जाळी आणली गेली आणि त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. उशिरापर्यंत तो दिसलाच नाही. त्यानंतर मोठा प्रकाशझोत असणारे दिवेही खरेदी करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी बिबटय़ाला पकडण्याची मोहीम हाती घेतली. उशिरापर्यंत तो हाती लागलेला नव्हता.