आ. शरद पाटील यांचा आरोप
तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्याचा ठराव ३१ जुलैच्या सर्वसाधारण सभेत संमत करून धुळे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची सप्टेंबर महिन्यात होणारी संभाव्य निवडणूक लांबणीवर टाकण्यात संचालक मंडळास यश आले असून सात फेब्रुवारी २०१४ पर्यंत संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली आहे. सत्ताधारी जवाहर गटाचा निवडणूक टाळण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप आ. प्रा. शरद पाटील यांनी केला आहे. मुदतवाढीच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहितीही आमदारांनी दिली आहे.
बाजार समितीत सुरू असणारा भ्रष्टाचार, पणन महासंघाने ओढलेले गंभीर ताशेरे, बाजार समितीची जवाहर शेतकरी सूतगिरणीकडे बाजार शुल्काआधारे असणारी कोटय़वधींची थकबाकी वसूल होण्याची भीती आणि स्पष्ट दिसणारा पराभव यामुळे रोहिदास पाटील व जवाहर गटाने निवडणुकीपासून पळपुटेपणा केला असा आरोप शरद पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रा. अरविंद जाधव यांनी केला आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत तीन ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी समितीने वेगवेगळी कारणे पुढे करण्यास सुरूवात केली होती.
विशेषत: संभाव्य निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असताना जवाहर गटाच्या विद्यमान संचालक मंडळाने ३१ जुलै २०१३ रोजी सर्वसाधारण सभेत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे, अशा प्रकारचा ठराव करून सहकार खात्यामार्फत निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.
त्याआधारे १३ ऑगस्ट रोजी सहा महिने निवडणूक पुढे ढकलण्याचा आदेश संमत करून शासनाची दिशाभूल केल्याचे शरद पाटील यांनी नमूद केले आहे. अतिवृष्टी जाहीर करण्यासाठी शासनाच्या दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी व प्रशासनाचा अहवाल हा महत्वाचा मानला जातो. परंतु सत्य परिस्थितीची माहिती न घेता खोटा ठराव शासनाकडे प्रस्तावित करणाऱ्या संबंधित विभागांवर देखील कारवाईची मागणी करणार असल्याचे शरद पाटील आणि प्रा. अरविंद जाधव यांनी नमूद केले आहे.
बाजार समितीच्या ठरावानुसार अतिवृष्टी मान्य केल्यामुळे राज्य सरकारला आता धुळे ग्रामीण मतदार संघात ओला दुष्काळ जाहीर करावे लागेल किंवा समितीच्या निवडणुकीस मुदतवाढ रद्द करून निवडणूक तत्काळ घ्यावी लागेल असेही आमदारांनी म्हटले आहे.