छत्रपती सेवा प्रतिष्ठानचा जिजामाता विद्वत् गौरव पुरस्कार यंदा काशीचे वेदशास्त्रसंपन्न पंडित प्रवर गणेश्वरशास्त्री द्रविड यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे हे सलग३२ वे वर्ष आहे.
अंजनगावसुर्जी येथील देवनाथपीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सायंटिफिक सोसायटी सभागृहात २१ जून रोजी दुपारी ४ वाजता आयोजित कार्यक्रमात पाथर्डी (नगर) येथील प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. नागपूरच्या श्री गुरू मंदिराचे सद्गुरुदास महाराज, देवनाथ वेद विद्यालयाचे प्रधानाचार्य वेदशास्त्रसंपन्न कृष्णशास्त्री आर्वीकर हे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
पद्मभूषण राजेश्वरशास्त्री द्रविड यांचे सुपुत्र असलेल्या गणेश्वरशास्त्री वेदशास्त्रसंपन्न, व्रतस्थ, घनपाठी विद्वान असून कृष्णयजुर्वेद, शुक्लयजुर्वेद, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, योगदर्शन शतपथ ब्राह्मण, धर्मशास्त्र, ज्योतिष, आयुर्वेद, स्मृतिग्रंथ आदींचे अधिकारी म्हणून मान्यताप्राप्त आहेत. चारही पीठांचे शंकराचार्य प्रसंगी त्यांचा सल्ला घेतात. एवढा अधिकार गणेश्वरशास्त्रींनी प्राप्त करून घेतलेला आहे. ज्योतिष व आयुर्वेदाच्या माध्यमातून सतत लोकोपयोगी कार्य करीत आहेत. धर्म, संस्कृती, इतिहास यापैकी कुठल्याही क्षेत्रात व्रतस्थपणे कार्य करणाऱ्या विद्वानाचे शिवराज्याभिषेक स्मृत्यर्थ जिजामाता विद्वत् गौरव पुरस्काराच्या माध्यमातून पूजन करण्याचा भाव या पुरस्कारामागे आहे. २१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्व नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.