मराठवाडय़ातील ६ जिल्ह्य़ांमध्ये ३ रुपये ८५ पैसे या दराने शिधाधारकांना ज्वारी उपलब्ध करून दिली जाणार आहे. स्वस्त धान्य दुकानात येत्या काही दिवसांत ज्वारी असेल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. प्रति कार्ड १० किलोपर्यंत ज्वारी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगत त्यांनी गव्हाचा कोटा कमी झाल्याचेही मान्य केले. दुष्काळग्रस्त भागातून स्थलांतरित झालेल्या व्यक्तींनाही रास्त दरात स्वस्त धान्य दिले जाईल. तसे शासन निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
या वर्षी ज्वारीच्या आधारभूत किमतीत मोठी वाढ झाली. गव्हापेक्षाही ज्वारीची आधारभूत किंमत अधिक असल्याने राज्य सरकारने साडेचार लाख टन ज्वारी खरेदी केल्याचे ते म्हणाले. त्यापैकी ३९ हजार मेट्रिक टन ज्वारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून स्वस्त धान्य दुकानात देण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. अंत्योदय योजनेचे लाभार्थी असणाऱ्यांना दीड रुपये किलो दराने ज्वारी दिली जाणार आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद व लातूर या ६ जिल्ह्य़ांमधून ज्वारीची मागणी आली होती. त्यानुसार मार्चपासून ज्वारी वितरण रास्त भाव दुकानातून केले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले. दुष्काळी भागात अन्नधान्याची अडचण जाणवते आहे का, हे तपासण्यासाठी जालना आणि औरंगाबादचा दौरा केल्याचे सांगत श्री. देशमुख म्हणाले, दारिद्रय़रेषेखालील शिधाधारकांना ३५ किलो धान्य दिले जाते. तर इतर शिधाधारकांना १२ किलो धान्य मिळते. राज्य सरकारने केंद्राकडे सर्वाना ३५ किलो धान्य देण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजूर होईल. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही या अनुषंगाने घोषणा केली असल्याचे ते म्हणाले. स्वस्त धान्य दुकानातून ज्वारी देण्याची घोषणा करणाऱ्या देशमुख यांना राज्याचा गव्हाचा कोटा का कमी झाला, याचे मात्र समाधानकारक उत्तर देता आले नाही. गहू आणि तांदूळ कमी पडू दिला जाणार नाही, एवढेच ते म्हणाले. ज्या साखर कारखान्यांनी लेव्हीची साखर देण्यास नकार दिला, अशा कारखान्यांवर कारवाई केली जाईल. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी केरोसीनच्या कोटय़ात वाढ करावी, अशी विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.