कल्याणमधील मुरबाड रस्त्यावरील कोटय़वधी रुपये किमतीची पालिकेची मालमत्ता ख्रिश्चन धर्मीयांकडून चालवल्या जाणाऱ्या संथोम ट्रस्ट संस्थेला ३० वर्षांच्या भाडेपट्टय़ाने कवडीमोलाने देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. या प्रस्तावाला भाजपच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. फक्त ९६ हजार रुपये वार्षिक भाडे आकारून ही मालमत्ता ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली आहे. प्रत्यक्षात महापालिकेला या मालमत्तेतून दीड ते दोन कोटी रुपये भाडे मिळाले असते.  
कल्याणमधील मुरबाड रस्त्यावर संथोम ट्रस्ट आहे. संस्थेत सामाजिक उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी ट्रस्टने बांधकाम केले आहे. या बांधकामातून पालिकेला समावेशक आरक्षणातून ‘सांस्कृतिक कल्याण केंद्रा’साठी ७६९ चौरस मीटरचे तयार सभागृह मिळाले आहे. हे सभागृह पालिकेने चालवले असते तर वार्षिक लाखो रुपये भाडे पालिकेला मिळाले असते. परंतु ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सात दिवसांपूर्वी पालिकेला पत्र देऊन हे सभागृह ट्रस्टच्या ताब्यात देण्यात यावे अशी मागणी केली.
तात्काळ आयुक्त शंकर भिसे यांनी ही जागा ट्रस्टला देण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो विषय सर्वसाधारण सभेत आणण्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांच्या ‘गळी’ उतरवला. या भागाचे स्थानिक नगरसेवक विद्याधर भोईर गेल्या वर्षी ट्रस्टने केलेल्या अनधिकृत बांधकामाविषयी जिवाच्या आकांताने ओरडत होते. तेही यावेळी ‘मूग’ गिळून बसले होते.
भाजपचे गटनेते श्रीकर चौधरी म्हणाले, ‘ट्रस्टच्या जागेत ख्रिश्चन धर्मीयांचे प्रार्थनास्थळ आहे. या ठिकाणी कोणताही ओरडा नको म्हणून ट्रस्ट जर ही जागा ताब्यात घेत असेल तर ते चुकीचे आहे. ही जागा सर्वधर्मीयांसाठी खुली पाहिजे. निविदा बोलीने हे केंद्र चालवायला देण्यासाठी देकार मागवा. पालिकेला त्यामधून फायदा होईल. राष्ट्रवादीच्या माधुरी काळे यांनी शासनाच्या दरापेक्षा कितीतरी कमी दराने ही वास्तू संथोम ट्रस्टला देण्यात येत आहे. यामधून पालिकेला काय लाभ होणार आहे असा प्रश्न केला. नेहमीप्रमाणे आर्थिक विषय घाईने मंजूर करण्यासाठी ‘आतूर’ असलेल्या महापौर कल्याणी पाटील यांनी सर्वमत घेऊन हा विषय मंजूर असल्याचे जाहीर केले. केंद्र व राज्य स्तरावरील काही राजकीय मंडळींनी हा प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून मोठा दबाव प्रशासनावर आणला होता. त्यामुळे आयुक्त भिसे हेही या प्रस्ताव मंजुरीच्या ‘गळाला’ लागले होते. क्रीडासंकुलातील मॉलच्या विषयावर ओरडणारे मनसेचे नगरसेवक संथोम ट्रस्टच्या विषयावर गूपचिळी धरून बसल्याने सभागृहात मनसेची अवस्था युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी दिसत होती.
अहवाल नजरेआड
संथोम ट्रस्टमधील सांस्कृतिक कल्याण केंद्राची जागा ट्रस्टला नाममात्र भाडय़ाने देण्याऐवजी रेडिरेकनर दराने देण्यात यावी. यामुळे पालिकेला कोटय़वधी रुपयांचे भाडे मिळेल असा प्रस्ताव पालिकेच्या नगररचना विभागाने आयुक्त शंकर भिसे यांना सादर केला होता. पण हा प्रस्ताव मंजूर करण्याची घाई झालेल्या आयुक्तांनी या फाईलकडे कानाडोळा करून पदाधिकाऱ्यांची खेळी यशस्वी केली असल्याची टीका शिवसेनेच्या शहर पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. आयुक्तांच्या संशयास्पद हालचालीबद्दल त्यांना हटवण्याची मोहीम सुरू करण्याच्या हालचाली शहरात सुरू झाल्या आहेत.