येथील शेतीप्रगती मासिक आणि अहिल्या कृषी संशोधन व विकास संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या शेतीप्रगती
कृषिभूषण २०१३ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २३ जानेवारी रोजी शिवाजी विद्यापीठाचे सह-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक प्रकाश भागवतवार, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, कर्नाटकचे माजी पाटबंधारे मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी शुक्रवारी येथे दिली.
या वर्षीच्या पुरस्कारासाठी जयसिंगपूर येथील प्रगतशील शेतकरी भूपाल गोविंद खामकर, गणेशवाडी येथील सेंद्रिय द्राक्ष बागायतदार सुरेंद्र बाबू शिरगावे, कुंभोज येथील चंबू आप्पा भोकरे, कुपवाड येथील आदर्श गोटाधारक नितीन लोकापुरे आणि गोमूत्र आर्काचे विविध प्रयोग करणारे गगनबावडा तालुक्यातील दिनकर कांबळे या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शिवाय कृषी विस्ताराचे नावीन्यपूर्ण काम करणारे शिरोळ पंचायत समितीचे अधिकारी सतीश देशमुख, बँक ऑफ इंडियाचे हातकणंगले तालुक्यातील प्रतिनिधी दिलीप घाटगे यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात तेजश प्रकाशनाच्या वतीने तन देई धन (प्रताप चिपळूणकर), शेतीची काटेरी वाट (सुधीर कुलकर्णी) आणि इये मराठीची नगरी (राजेंद्र घोरपडे) या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.