दोन महिन्यापूर्वी अपहृत बालकाला गिट्टीखदान पोलिसांनी आंध्रप्रदेशातून आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केले. बाळ हाती पडताच आईवडिलांना अत्यानंद झाला. दरम्यान, पोलिसांनी अपहरण करणाऱ्या दाम्पत्यास अटक केली आहे.
दुर्गा उईके आणि धनराज उईके असे आरोपी दामप्त्याचे नाव आहे. मूलबाळ होत नसल्याने पाच महिने वय असलेल्या बाळाचे अपहरण केल्याचे पोलिसांना सांगितले. उईके दाम्पत्य गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जगदीशनगरात भाडय़ाने राहात होते. ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. यादरम्यान धनराजची मैत्री राहुल माणिकराव रोकडे याच्याशी झाली. राहुल हा अविवाहित असून इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. राहुलने आपल्या गावातील रंजना नावाच्या महिलेला पळवून आणले. यावेळी राहुलने धनराजला मदत मागितली. धनराजने त्याला जगदीशनगरात एक घर भाडय़ाने मिळवून दिले. यानंतर राहुल आणि रंजना हे दोघे पती-पत्नी म्हणून राहू लागले. यादरम्यान रंजना गर्भवती झाली. राहुलला मुलबाळ नको होते. त्यामुळे गर्भपात करण्यासाठी तिला डॉक्टरकडे नेले असता सहा महिन्याचा गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गर्भपात करणे अशक्य होते. बाळ झाल्यानंतर राहुल ते धनराजला देईल, असा दोघांमध्ये अलिखित करार झाला. यानंतर धनराज आणि दुर्गा लालसेपोटी त्यांची मदत करू लागले. रंजनाने तीन महिन्यापूर्वी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव रुद्र ठेवण्यात आले. यानंतर राहुल आणि रंजनाने बाळाला देण्यास नकार दिला.
तसेच या बाळाला एक लाख रुपयामध्ये विकून टाकू, असे राहुल आणि रंजनाने ठरवले. ही माहिती मिळताच धनराज आणि दुर्गा उईके यांनी १ जानेवारी २०१४ रोजी या बाळाचे अपहरण केले. या घटनेनंतर जवळपास एक महिना दोघेही चूप बसले. एक महिन्यानंतर १ फेब्रुवारी २०१३ रोजी राहुल आणि रंजनाने गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठून बाळाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक सुनील बोंडे आणि द्वितीय पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय केदारे यांच्याकडे सोपवला. उईके दाम्पत्य निजामाबादजवळील आरमूर येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दाम्पत्य येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम करू लागले. या माहितीवरून पोलीस तेथे गेले. केदारे यांनी आरमूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण यांची मदत घेतली. जवळपास या परिसरातील
तीनशे इमारती पालथ्या घातल्या. यानंतर एका इमारतीत उईके दाम्पत्य आढळून आले. केदारे यांनी त्यांना गुरुवारी सकाळी नागपुरात आणले. यानंतर पोलीस निरीक्षक सुनील बोंडे यांनी त्या बाळाला रोकडे दाम्पत्याच्या स्वाधीन केले. यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मूलबाळ होत नसल्याने या बाळाचे अपहरण केल्याची कबुली उईके दाम्पत्यांनी
पोलिसांना दिली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित
अपहृत बालक दोन महिन्यानंतर आईच्या कुशीत
दोन महिन्यापूर्वी अपहृत बालकाला गिट्टीखदान पोलिसांनी आंध्रप्रदेशातून आणून आई-वडिलांच्या स्वाधीन केले.
First published on: 15-03-2014 at 06:04 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidnapped child meet mother after two months