संपर्क प्रमुख व संपर्क नेते यांच्या सरंजाम, मुजोर व मनमानी प्रवृत्तीमुळे कोल्हापुरातील शिवसेना दुहीच्या उंबरठय़ावर आली आहे. तिळगूळ घ्या गोड बोला असा मधुर सूर ऐकू येण्याच्या संक्रांतीच्या दिवशीच चक्क पायातील हातात घेण्याची कोल्हापुरी भाषा ऐकविली गेल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद कोणत्या टोकावर गेलेले आहेत, याची कल्पना यावी. एका गटाला जवळ करायचे आणि दुसऱ्याचे खच्चीकरण करीत रहायचे या नेत्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे सामान्य शिवसैनिक अक्षरश: वैतागला आहे. हवी तशी सेवा पुरवूनही वर मनावर घाव घालणाऱ्या शिव्यांची लाखोली वाहिली जात असल्याने मुंबईहून येणाऱ्या नेत्यांना कधी चोप बसेल, हे सांगता येणार नाही इतकी परिस्थिती थराला गेली आहे. आपआपसातच लढण्याच्या शिवसेनेच्या या नव्या स्टाईलने पक्षाच्या अस्तित्वाला हादरे बसू लागल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.    
शिवसेनेच्या लेखी कोल्हापुरातील राजकारणाला खूपच महत्त्व आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला अपेक्षित साथ मिळत नसली तरी करवीर नगरीत पक्ष भक्कम व्हावा, यासाठी नेतृत्वाची धडपड सुरू असते. खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नव्या कार्याचा, मोहिमेचा आरंभ महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापुरातूनच करीत असत. त्यांचाच पायंडा पुढे चालवित कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पहिला दौरा कोल्हापुरातच केला होता. तेंव्हा त्यांनी हवालदिल झालेल्या शिवसैनिकांना आधार देतांना ‘आता रडायचं नाही, लढायचं’ असा संदेश देऊन मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेला अवघा महिनाही उलटला नाही, तोवर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी, नेत्यांनी व संपर्क प्रमुखांनी उध्दव ठाकरेंच्या विधानाचा भलताच अर्थ घेतला. या सर्वानी मिळून कोल्हापुरातील राजकारणाचा आखाडा करतांना परस्परांतच लढाईला सुरूवात केली आहे. त्याचा प्रत्यय मकर संक्रांतीला चंदगड पोटनिवडणुकीच्या बैठकीवेळी आला. संपर्कप्रमुख दिवाकर रावते व नेते अरूण दुधवाडकर हे कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांना पाठीशी घालत असतांना आपल्याला मात्र अवमानास्पद वागणूक देतात, असे म्हणत जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या दोघा नेत्यांना कडवे आव्हानच दिले. त्यातून तोंड गोड करण्याच्या संक्रांतीच्या सणादिवशी शिवसेनेत शिमगा झाल्याचे दुर्दैवी चित्र पहावयास मिळाले. या वादातूनच पवार व सहकाऱ्यांनी वेगळा विचार करण्याचा इशारा दिल्याने शिवसेनेला फुटीचा धोकाही जाणवू लागला आहे. सिंधुदुर्ग, नाशिक येथे शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेल्याचे चित्र असतांना कोल्हापुरातील वाद हा पक्ष बांधणीच्यादृष्टीने आणखीनच घातक ठरणार असल्याचे दिसत आहे.     
कोल्हापुरातील शिवसेनेतील अंतर्गत वाद तसेच संपर्क नेत्याची मुजोर भूमिका ही काही नवी नाही. सेनाप्रमुखांनी १६ मे १९८६ रोजी कोल्हापुरात शिवसेनेची स्थापना केली. तेंव्हापासूनच अंतर्गत संघर्षांची बीजे रोवली गेली. दोनदा आमदार झालेले सुरेश साळोखे व जिल्हाप्रमुख रामभाऊ चव्हाण यांच्यातील वाद एकमेकांवर गोळ्या झाडण्यापर्यंत गेला होता. असे अनेक किस्से केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर प्रत्येक तालुक्यामध्ये अनेकदा पहायला मिळाले आहेत. एकीकडे गाव तेथे शिवसेना अशी हाकाटी पिटत पक्षबांधणी भक्कम करण्याचा विचार व्यासपीठावरून नेते जाहीर करीत असतात. तर प्रत्यक्षात दुसरीकडे, गटबाजीला उत्तेजन देतांना गावोगावच्या शिवसैनिकांचे पध्दतशीर खच्चीकरणही केले जात असते. अलीकडच्याकाळात अशा घटना सार्वजनिकरित्या चर्चेला येत आहेत. पूर्वी शिवसेना प्रमुख असतांना शिवसेनेच्या चिरेबंदी वाडय़ातील अंतर्गत वादाची केवळ कुजबूज व्हायची. पण गेल्या कांही दिवसात अंतर्गत वादाचे बारीक सारीक तपशीलही उघडपणे बोलले जात आहेत.    
शिवसेनेतील संपर्क प्रमुख व नेत्यांची भूमिका हीच अंतर्गत वादाला मुख्य कारणीभूत ठरली आहे. सामान्य शिवसैनिकसुध्दा या पदाधिकाऱ्यांना केवळ बॅगा भरण्यातच रस असल्याचे उघडपणे बोलत आहे. इतक्यावरच त्यांचे समाधान होत नाही, तर सामान्य कार्यकर्त्यांपासून ते जिल्ह्य़ातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा उघडपणे पाणउताराही त्यांच्याकडून होत असतो. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या इचलकरंजीतील कांही पदाधिकाऱ्यांनी आयात होणाऱ्या नेतृत्वास चोप देण्याचा प्रयत्नही मध्यंतरी केला होता. अशाप्रकारच्या घटना जिल्ह्य़ात इतरत्र होत असल्याने शिवसैनिकांत खदखद सुरू आहे.     
कोल्हापुरातील शिवसेनेत जिल्ह्य़ात वर्चस्व कोणाचे यावरूनही वाद धुमसत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे शहर प्रमुख असल्याने ते बदलले जावे, अशी मागणी करीत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न जिल्हाप्रमुख पवार व विजय देवणे यांच्या गटाकडून होतांना दिसतो. तर या दोघांचे खच्चीकरण करण्यासाठी क्षीरसागर यांच्याकडून कुरघोडय़ा सुरू असतात. लोकसभा निवडणुकीसाठी विजय देवणे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी चालविलेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच करून क्षीरसागर यांनी देवणे यांच्या वाटेत काटे पेरण्याचे काम केले आहे. एकमेकांच्या उकाळ्यापाकाळ्या काढण्याबरोबरच पक्षाच्या नावावर आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रकारही जबाबदार घटकांकडून होत आहे. याची वाच्चता होऊ लागल्याने ८० टक्के समाजकारण करण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या प्रतिमेला धक्का बसत चालला आहे. परिस्थिती विकोपाला गेली असल्याचे वारंवार स्पष्ट होत असल्याने उध्दव ठाकरे यांनाच हा प्रकार रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार हे यातून स्पष्ट होत आहे.