कोटक महिंद्र बँकेने (केएमबी) मुलांसाठी आर्थिक बचतीचा कार्यक्रम तयार केला आहे. केएमबीने खास मुलांसाठी तयार केलेल्या ‘कोटक ज्युनियर’  बचत खात्याची आज घोषणा केली. दीर्घकालीन बचतीसाठी १० वर्षांचे आवर्ती जमा खातेही सादर केले आहे. कोटक ज्युनियर खाते शून्य ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना उघडता येईल. ‘माय ज्युनियर कार्ड’सारखी अनेक वैशिष्टय़े असून तरुणांना आवडतील अशा काही ऑफर्स यामध्ये आहेत. मुलांसाठीच्या बचत खात्यासह पालकांनाही आता मुलांसाठी दीर्घकालीन निधी जमावता येईल. पालकांना आयकर खात्याच्या कलम ८० टीटीए अंतर्गत १० हजार रुपयांच्यावर फायद्याव्यतिरिक्त अल्पवयीन बचत खात्यावरील उत्पन्नावर आयकर खात्याच्या कलम १० (३२) अंतर्गत सूट मिळणार आहे. या कार्यक्रमामुळे दीर्घकालीन बचतीचे नियोजन करणे शक्य होते. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नियमित बचत होऊ शकते. मुलांना बचतीची सवय लागावी म्हणून ‘केएमबी’ने एक हा कार्यक्रम आखला आहे. केएमबी राज्यात वर्षभरात ५० नव्या शाखा उघडणार आहेत. नागपुरातही बँकेच्या शाखांचा विस्तार केला जाणार आहे, असे केएमबीचे कार्यकारी उपाध्यक्ष व प्रमुख विराट दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी केएमबीच्या किंग्जवे शाखेचे व्यवस्थापक अमोल घाटे आणि वर्धमाननगर शाखचे व्यवस्थापक आशीश वरणशिवार उपस्थित होते.
वेकोलि मुख्यालयाच्या मनुष्यबळ विकास विभागात आरोग्य अधिकाऱ्यांची तीन दिवसांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन वेकोलिचे कार्मिक संचालक रूपक दयाल यांच्या हस्ते झाले. वेकोलि कर्मचाऱ्यांच्या सेवेत डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही डॉक्टर्स त्यांचे कार्य कुशलतेने करतात, असे विचार दयाल यांनी व्यक्त केले. वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. जय देशमुख यांनी वेकोलितील डॉक्टरांना मार्गदर्शन केले. रुग्णांनी अंमलीपदार्थाचे सेवन करू नये, यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे, हृदयरोगाची लक्षणे आणि प्रथमोपचाराबाबत त्यांनी माहिती दिली. यावेळी वेकोलिच्या मुख्यआरोग्य अधिकारी डॉ. बेला भटाचार्य, डॉ. रवी वाघमारे, डॉ. बी.एम. सिंह उपस्थित होते.   मनुष्यबळ विकास विभागाचे महाव्यवस्थापक एम.के. सिंह यांनी आरोग्य अधिकाऱ्यांचे स्वागत केले.
रेवती असोसिएट्सने इस्टेट क्षेत्रात ‘एलएलपी’ ही एक अनोखी योजना सादर केली आहे. रियल इस्टेट क्षेत्रात अभुतपूर्व मंदीच्या काळातही गुंतवणूकदारांना ही योजना म्हणजे एक संजीवनी ठरेल, असे मत कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुहास मोरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.  ‘एलएलपी’ योजना गुंतवणूकदारांचा रियल इस्टेट क्षेत्रात ढासाळलेला विश्वास पुन्हा जागृत करून शहरातील गुंतवणूकदार योजनेला भक्कम प्रतिसाद देतील, असा विश्वास कंपनीच्या उपाध्यक्ष विद्या मोरे यांनी व्यक्त केला.
एलएलपी उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणूकदारांना भक्कम सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे. २००६ मध्ये एलएलपी लागू करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून  सामान्यांना श्रीमंत होण्याची उत्तम संधी आहे, असे मत कंपनीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक किटकुले यांनी सांगितले. नागपूर शहर व पुणे येथे कंपनीचे उपक्रम सुरू असून या दोन्ही शहरांतील गुंतवणूकदारांना योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला एलएलपी व्यवस्थापक कामिनी सिंग, दीपाली मालेवार, श्रुती वाजपेयी, अंकिता नायडू, रोशनी सावरकर, रसिका काळे उपस्थित होते. उपक्रमासाठी सिक्स सेन्स व स्पर्श इव्हेन्ट्सचे अक्षय हेटे,अनुराग भुसारी, विश्वेश व विशाल खानझोडे सहकार्य करीत आहेत.