पालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत जुहू, विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले खरे. मात्र या रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याची ओरड करीत शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनेच आता पालिका प्रशासनावर तोफ डागायला सुरुवात केली आहे. सेनेच्या कामगार संघटनेने एक प्रकारे हा ‘घरचा अहेर’च दिला आहे.
सहा महिन्यांत पालिका प्रशासनाने तीन रुग्णालयांचे उद्घाटन केले. मात्र कूपरमध्ये एका पाळीत किमान दोन वेळा साफसफाई होत नाही. त्यामुळे रुग्णांना संसर्ग होऊ शकतो, असा आरोप करीत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी कूपरमधील असुविधांचा पाढा वाचला. कूपर रुग्णालयांतील असुविधांबाबतचे एक पत्र सुनील चिटणीस यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पाठवले आहे.
कूपरची नवी इमारत मॉलच्या धाटणीची असून तळघरात बाह्य़रुग्ण विभाग आहे. तेथे रुग्ण आणि नातेवाईकांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सांडपाण्याची व्यवस्था सदोष आहे. त्यामुळे असह्य दरुगधी पसरली आहे. बाह्य़रुग्ण विभागातील डॉक्टर आणि परिचारिकांना हात धुण्यासाठी साधे बेसिनही नाही. या इमारतीत सौर उर्जेद्वारे पाणी गरम केले जाईल अशी घोषणा केली होती. परंतु ही यंत्रणा अद्यापही कार्यान्वित झालेली नाही. येथे मोठय़ा प्रमाणावर फार्मासिस्टची गरज आहे. पहिल्या मजल्यावरील अपघात विभागात रुग्णांच्या नोंदणीसाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. या विभागात रात्री कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांसाठी चहा, कॉफीची व्यवस्था ही पालिकेच्या धोरणाचा भाग आहे. पण ट्रॉमा विभागात पॅन्ट्रीची सोयच नाही. जैविक कचरा टाकण्याची व्यवस्था नाही. अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभागासाठी स्वतंत्र परिसेविकांची गरज आहे. या रुग्णालयाची क्षमता ६०० खाटांची आहे. परंतु कमी कर्मचारी वर्ग असल्यामुळे त्याचा रुग्णांना फटका बसतो. शस्त्रक्रिया विभाग आणि प्रसुती विभागात र्निजतुकीकरणाची व्यवस्था तातडीने करावी, अशी तक्रार करीत सुनील चिटणीस यांनी पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला आहे. मात्र सुनील प्रभू यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत.
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याबरोबर सुनील चिटणीस यांची एक बैठकही झाली. येत्या तीन महिन्यांमध्ये कूपर रुग्णालयात योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे आश्वासन म्हैसकर यांनी दिल्याचे चिटणसी यांनी सांगितले.