डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथील महापालिकेच्या ४० एकर चौपाटीच्या आरक्षणावर सुमारे १०० ते १५० अनधिकृत चाळी भूमाफियांनी उभारल्या आहेत. आता ही जागा कमी पडते की काय म्हणून कोपर रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागातील कोपर-आयरे भागातील तलाव व चौपाटीच्या आरक्षणावर भूमाफियांनी चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे.
या अनधिकृत चाळींमधून भूमाफिया, दलालांची चांदी होत आहे. पालिकेचे स्थानिक प्रभाग क्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने ही बांधकामे केली जात आहेत अशा तक्रारी आहेत. गरिबाचा वाडा, कोपर-आयरे भागातील अनधिकृत चाळींना चोरून मुबलक पाणीपुरवठा होत आहे. शहराच्या टोकाला या अनधिकृत चाळी असल्याने या भागाला मुबलक पाणीपुरवठा व्हावा म्हणून जलवाहिन्यांवर जागोजागी पाणी खेचण्यासाठी बूस्टर बसविण्यात आले आहेत. या भागात महावितरण कंपनीने वीज पुरवठय़ाची तत्पर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोपर पूर्व रेल्वे स्थानक-आयरे गावातील सव्र्हे क्रमांक १११ हा साडेसहा एकर चौपाटी आरक्षणाचा भूखंड आहे. ही गावे १९८३ मध्ये पालिका हद्दीत वर्ग झाल्यानंतर या चौपाटीच्या आरक्षणाची मालकी पालिकेच्या नावावर वर्ग झाली आहे. या चौपाटीचे भूमिअभिलेख विभागाकडून सीमांकन करून चारही हद्दी निश्चित करून त्याला संरक्षक िभत बांधणे आवश्यक होते. अशी कोणतीही काळजी पालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांत घेतलेली नाही. या चौपाटीच्या आरक्षणावर भूमाफियांनी कब्जा सुरू केला आहे. या भागातील एका नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. एका शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर गाळ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पालिकेचा नगररचना विभाग, प्रभाग अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे ही अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याची टीका होत आहे. आपले बांधकाम तोडल्यानंतर ग प्रभागातील एका माजी कर्मचाऱ्याने आपल्याकडून लाखो रुपये उकळले असल्याची तक्रार या भागातील ग्रामस्थ सोमनाथ माळी यांनी लेखी पत्राद्वारे प्रभाग अधिकारी पारचे यांच्याकडे केली आहे. आमची बांधकामे तोडता, मग लोकप्रतिनिधींची बांधकामे का तोडत नाहीत, असा प्रश्न माळी यांनी करून ग प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.कोपर पूर्व, आयरे गाव भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना पालिका अधिकाऱ्यांनी अजिबात हात लावू नये. तेथील अनधिकृत जलवाहिन्या तोडू नयेत. म्हणून पालिका हद्दीशी संबंधित नसलेला एक आमदार महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचे आयरे गावातील काही जाणकार नागरिकांनी सांगितले. या भागात सध्या सुमारे १०० ते १५० अनधिकृत जलवाहिन्या आहेत. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हेतुपुरस्सर या चोरीच्या जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षभरात आयरे भागातील २०० ते ३०० अनधिकृत चाळींपैकी फक्त २३ चाळी तोडण्यात आल्याचा देखावा करण्यात आला आहे. पाण्याच्या ३५ नळजोडण्या तोडल्याचे चित्र प्रशासनाने कागदोपत्री उभे केले आहे. याबाबत उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी सांगितले, या चौपाटीच्या भूखंडाची मोजणी करून चतु:सीमा निश्चित केल्या आहेत. लवकरच या भूखंडाला संरक्षित भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात येईल. या भागातील तलावाची जागा गाळाने भरली आहे. त्यासही संरक्षक भिंत करण्यात येणार आहे. या जागेवर कोणीही बांधकाम करू नये म्हणून दर पंधरा दिवसांनी या जागांचा आढावा घेतला जाईल. यापूर्वी या जागांवरील चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2013 रोजी प्रकाशित
आयरे गावातील चौपाटी, तलावाला भूमाफियांचा वेढा
डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथील महापालिकेच्या ४० एकर चौपाटीच्या आरक्षणावर सुमारे १०० ते १५० अनधिकृत चाळी भूमाफियांनी उभारल्या आहेत.
First published on: 16-10-2013 at 08:36 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land robbers in the ayre village