घरात बाई दिवसभर राब राब राबते, मात्र संध्याकाळी दिवसभर काय केले, असे विचारले तर तिला सांगता येत नाही. ‘बाई बसेना अन् काम दिसेना’ अशी म्हण प्रचलित आहे. तशीच अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे, असे प्रतिपादन लातूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
काँग्रेसच्या लातूर जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित वचनपूर्ती मेळाव्यात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर होते. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार अमित देशमुख, बसवराज पाटील व वैजनाथ िशदे, अॅड. त्र्यंबकदास झंवर आदींची उपस्थिती होती. पाटील म्हणाले, की काँग्रेसने सत्तास्थापनेनंतर आपल्या कार्यकाळात सामान्यांचे प्रश्न सोडविण्यास अनेक योजना आणल्या. खऱ्या अर्थाने गरिबांची मदत करणारी काँग्रेस आहे, मात्र केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडत आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत: योजनांचा अभ्यास करून तो आत्मविश्वासाने लोकांना सांगितला पाहिजे.
आमदार अमित देशमुख म्हणाले, की पक्षाध्यक्ष सोनिया गांधी येत्या लोकसभेचा उमेदवार ठरविणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी याबाबत चर्चा न करता कामाला लागावे. विलासराव देशमुखांनी सामान्यांसाठी काय केले, हे लातूरकर जाणतात. मी अमित विलासराव देशमुख आहे. त्यांनी मला श्वास दिला. जिल्हय़ात काँग्रेसने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सर्वानी उचलावी, असे आवाहन त्यांनी केले. सन २००९मध्ये काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली सर्व वचने पूर्ण केली असून, विरोधकांची तोंडे गप्प करण्याची जबाबदारी गावोगावच्या कार्यकर्त्यांची असल्याचेही ते म्हणाले.
विखे यांनी गट-तट विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व काँग्रेस पक्ष मजबूत राहील यादृष्टीने कामाला लागावे, असे आवाहन केले. रस्त्यावर आज अंगभर कपडे वापरणारे लोक मोठय़ा प्रमाणात दिसतात, हे काँग्रेसचे यश असून आता लोकांना अन्नसुरक्षा देऊन काँग्रेसने चांगले जीवन जगण्याची हमी दिल्याचे अॅड. झंवर म्हणाले. जातिधर्मात भांडणे लावण्याचे काम भाजपचे, तर सर्वाना एकत्र ठेवण्याचे काम काँग्रेसचे आहे. तुम्हाला भांडणे हवीत की एकोपा? असा प्रश्न नागरिकांना विचारण्याची गरज असल्याचे निलंगेकर यांनी नमूद केले.