लोकशाहीत न्यायपालिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जात, धर्म, पंथ, व्यवसाय आणि रंग आदींमध्ये भेद न करता कायदेशीर बाबी तपासून न्यायदान करण्याची जबाबदारी न्यायपालिकेवर आहे. न्यायालयीन कामकाजाची विशिष्ट शैली आहे. विद्यार्थीदशेतच न्यायालयाची कार्यपद्धत अवगत करण्याच्या दृष्टीने जस्टा कॉजासारखे महोत्सव उपयोगी पडतात, असा उपदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती वासंती नाईक यांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या ‘जस्टा कॉजा’ या विधि महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नाईक प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्या. के.जे. रोही उपस्थित होते.
वकिली व्यवसायात करिअरच्या उत्तम संधी आहेत. विधि अभ्यासक्रम पूर्ण करणारे प्रत्येकजण वकिली करीत नाहीत. पूर्वी फार कमी मुली या क्षेत्राकडे वळत. वर्तमानस्थितीत महिलांनी या क्षेत्राला करिअर केले असून प्रामाणिक आणि सचोटीने काम करणाऱ्या महिलाही या क्षेत्रात असून महिलांनी जास्त संख्येने या क्षेत्राकडे वळले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. शासकीय यंत्रणेत महसूल आणि विधि विभाग महत्त्वाचे असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विधि विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. न्यायसंस्थेत मोठय़ा संख्येने रोजगाराच्या संधी आहेत. विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन संधीचे सोने करावे, असे आवाहन न्या. रोही यांनी केले.  वर्तमानातील स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. व्यवसाय निवडताना प्रत्येकाने १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करावा. यातून ध्येय गाठण्यास मदत होते. ध्येय गाठत असताना सर्वोच्च स्थान न मिळाल्यास निराश होऊ नये. त्यासाठी नव्या जोमाने कामाला लागावे, असे प्रतिपादन डॉ. येंकी यांनी यावेळी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विभा महाजनी यांनी केले.  यावर्षीच्या जस्टा कॉजासाठी देशभरातील २० विधि महाविद्यालयांच्या चमूंनी भाग घेतला. संचालन किष्णी त्रिवेदी आणि धनश्री गवळी या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाला हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल मार्डीकर, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल,  प्रा. अधरा देशपांडे यांचे सहकार्य लाभले.