जिल्हय़ातील २०० गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा मतदान केंद्रांची माहिती सरकार दरबारी सादर झाली. मतदारांमधील ‘आळस’ आणि ‘उदासीनता’ ही दोन प्रमुख कारणे प्रशासनाने पुढे केली. या तालुक्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येईल, असेही कळविले गेले. विशेष म्हणजे काही केंद्रांवर मतदानच झाले नाही, तर काही केंद्रांचे मतदान ५-१० टक्केही नसल्याचे उघडकीस आले.
सिल्लोडला सर्वात कमी (४४ टक्के) नोंदविले गेले, तर काँग्रेस नेते नितीन पाटील यांचे मूळ गाव असणाऱ्या कन्नड तालुक्यातील नागद येथे गेल्या निवडणुकीत केवळ २०.४३ टक्के मतदान झाले. मतदान एवढे कमी कसे, त्यास कन्नड तालुक्यातील अधिका-यांनी ‘तात्पुरते स्थलांतर’ असे उत्तर दिले. फुलंब्री तालुक्यातील लालवण गावी मतदान झालेच नाही. या वेळी सूक्ष्म निरीक्षकांनी या गावाला भेट दिली आणि मतदारांनी मतदानास पुन्हा नकार दिला. गोलटगाव येथेही केवळ १३.५५ टक्के मतदान झाले.
औरंगाबाद शहरातील केंद्रांवर कमी मतदान का झाले, याचा आढावाही घेण्यात आला. युनूस कॉलनीतील दोन केंद्रांवर अनुक्रमे २३.६४ व २८.९५ टक्के मतदान झाले. येथील कामगार रोजंदारीच्या कामाला जातात. कमी मतदानासाठी कामगारांची वसाहत असे कारण प्रशासनाने दिले. जाधववाडी, सिडको येथेही कमी मतदान झाले. सिडकोत पोलीस कॉलनीचा भाग असल्याने पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर असतात. त्यामुळे तेथे कमी मतदान झाल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी अतिगरीब लोकांची वस्ती, तर काही ठिकाणी अतिश्रीमंतांची वस्ती. त्यामुळेही मतदान कमी झाल्याचे कारण तहसीलदारांनी प्रशासनाला कळविले.
छावणी, तिसगाव, सातारा येथील लोक परगावी नोकरीला जात असल्याने मतदान कमी झाल्याचे सांगितले जाते. ३० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असणाऱ्या केंद्रांवरील ही आकडेवारी निवडणूक आयोगाची चिंता वाढविणारी ठरली आहे. त्यामुळे मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील गारखेडा परिसरात सर्वात कमी (३२ टक्के) मतदान झाले.
पैठण तालुक्यातील बोरगाव व दरेगाव या दोन मतदारसंघांत मतदानावर गेल्या वेळी बहिष्कार टाकला होता. या वेळी त्यांनी बहिष्कार टाकू नये, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. येथे अनुक्रमे ० टक्के व ०.१३ टक्के मतदान झाले होते. दरेगाव येथे ७४९पैकी एकानेच मतदान केले होते. अन्य ठिकाणी मतदारांचे स्थलांतर झाल्याचे कारण देण्यात आले. तांदूळवाडी, मांडवा, पाच पीरवाडी, कोबापूर येथील गावक-यांनी मतदानावर अंशत: व पूर्णत: बहिष्कार टाकला. अन्य ठिकाणी स्थायी कामगारांचे स्थलांतर हे कमी मतदानाचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. वैजापूर मतदारसंघात मतदारांची उदासीनता हेच एकमेव कारण पुढे करण्यात आले.
जातेगाव येथील केंद्रावर ४.४७, बाभुळगाव, कापूस वाडगाव, वाकला, तलवाडा, संवदगाव येथे १० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. या सर्व केंद्रांवर जागृती करण्याबाबत अहवाल पाठविण्यात आला. काही ठिकाणी जागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2014 रोजी प्रकाशित
मतदारांचाच ‘आळस’ नि ‘उदासीनता’!
जिल्हय़ातील २०० गावांमध्ये ३० टक्क्यांपेक्षाही कमी मतदान झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीतील अशा मतदान केंद्रांची माहिती सरकार दरबारी सादर झाली. मतदारांमधील ‘आळस’ आणि ‘उदासीनता’ ही दोन प्रमुख कारणे प्रशासनाने पुढे केली. या तालुक्यांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येईल, असेही कळविले गेले.
First published on: 19-02-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laziness and indifference in constituent