जेएनपीटी बंदरावरील कामगारांसाठी असलेल्या कामगार रुग्णालयाला सध्या गळती लागली आहे. गळती रोखण्यास जेएनपीटी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. आता या गळतीची कारणे शोधण्यासाठी केंद्रीय शिपिंग विभागाने इंडियन रजिस्ट्रार शिपिंगच्या पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्या देखरेखीखाली पुढील दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.
वसाहतीत पंचवीस वर्षांपूर्वी रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या छताला सातत्याने वॉटरप्रूफिंग केले असतानाही गळती थांबलेली नाही. त्यासाठी खर्च करण्यात आलेले कोटय़वधी रुपयेही पाण्यात जात आहेत. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अनेक ठिकाणी गळती लागल्याने या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर रुग्णालयातील तळ मजल्यावर असलेल्या कँटीनमध्ये मोठय़ा प्रमाणात गळती सुरू आहे. त्यामुळे छताचे प्लास्टरही अनेक वेळा कोसळत आहे. गळती थांबविण्यासाठी सध्या रुग्णालयाच्या छतावर ताडपत्री टाकण्यात आली असताना या परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. याची गंभीर दखल घेऊन केंद्रीय शिपिंग विभागाने गळतीची कारणे शोधण्यासाठी व्यवस्थापक श्रीकांत आरोळे यांचे एक पथक पाठविले आहे. या पथकाच्या माध्यमातून रुग्णालयासह वसाहत तसेच बंदरातील वास्तूची पाहणी करून त्यांची योग्य ती दुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती आरोळे यांनी दिली आहे.