कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त उद्या रविवारी ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या निमित्त तिघा पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे. शाहू स्मारक येथे दुपारी चार वाजता पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असुरक्षित समाज आणि माध्यमांचा दृष्टिकोन या विषयावर पत्रकार जतिन देसाई (मुंबई) यांचे व्याख्यान होणार आहे. प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट पत्रकार, छायाचित्रकार व कॅमेरामन पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जानव्ही सराटे (महाराष्ट्र टाईम्स), उत्कृष्ट कॅमेरामन मिथून राज्याध्यक्ष (झी २४ तास) व उत्कृष्ट छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ (लोकमत) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये विभागीय माहिती अधिकारी वसंत शिर्के व ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजार यांचा समावेश होता, अशी माहिती प्रेस क्लबच्या अध्यक्षा अनुराधा कदम यांनी दिली.